नवी दिल्ली | Danni Wyatt : भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज करणारी आणि नंतर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सोबतचा फोटो व्हायरल झालेली महिला क्रिकेटपटू डॅनियल व्हॅट हिने थाटामाटात समलिंगी विवाह केला.
लंडनमधील कॅबेज फुटबॉल क्लबची प्रमुख जॉर्जिया हॉज हिच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आणि त्या लग्नाची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. 22 ऑगस्ट 2024 ला हा सोहळा पार पडला.
डॅनियल व्हॅटने फोटोंसोबत लिहिले, मिस्टर आणि मिसेस. लग्नाची तारीख 22.08.2024. डॅनियल आणि जॉर्जिया या जोडीने 2023 मध्येच एकमेकांवरील प्रेम जाहीर केले होते. त्या घोषणेने सारेच चकित झाले होते. इंग्लंडची महिला अष्टपैलू डॅनियल व्हॅट ही यष्टिरक्षक-फलंदाज आहे. ती आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लिश क्रिकेट संघाचे अनेक विक्रम तिच्या नावावर आहेत. ती फ्रँचायझी क्रिकेटही खूप खेळते.
व्हॅटने फोटो शेअर करताच इन्स्टाग्रामच्या कमेंट बॉक्समध्ये अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. भारतातूनही अनेकांनी आपल्या आवडत्या स्टारला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.