

लंडन : मागील आठवड्यात अॅशेस मालिकेतून वगळण्यात आल्यानंतर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या 15 वर्षांच्या इंग्लंडमधील क्रिकेट कारकिर्दीत, वेगवान गोलंदाज-अष्टपैलू असलेल्या वोक्सने 62 कसोटी सामन्यांमध्ये 2034 धावा करत 192 बळी मिळवले.
या 36 वर्षीय खेळाडूने 122 वन डे आणि 33 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले असून, त्यात अनुक्रमे 1524 आणि 147 धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांत मिळून त्याने एकूण 204 बळी घेतले आहेत.
वोक्स अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध ओव्हलवर खेळला. त्यावेळी पाचव्या कसोटीत पाहुण्या संघाला मालिका बरोबरीत सोडवण्यापासून रोखण्यासाठी त्याने हाताला स्लिंग लावून फलंदाजी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
वोक्स इंग्लंडच्या दोन आयसीसी विश्वचषक विजेत्या संघांचा सदस्य होता. यामध्ये 2019 वन डे विश्वचषक आणि 2022 मधील टी-20 विश्वचषकाचा समावेश आहे.