ENG vs NZ : लॉर्ड्सवर गोलंदाजांचे तांडव, एकापाठोपाठ फलंदाजांच्या दांड्या गुल! पहिल्याच दिवशी १६ विकेट्स, रॉबिन्सनचा विक्रमी मारा

इरफान पठाण, मिचेल स्टार्कच्या क्लबमध्ये ओली रॉबिन्सनची एन्ट्री; लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंड बॅकफुटवर
ENG vs NZ : लॉर्ड्सवर गोलंदाजांचे तांडव, एकापाठोपाठ फलंदाजांच्या दांड्या गुल! पहिल्याच दिवशी १६ विकेट्स, रॉबिन्सनचा विक्रमी मारा
Published on
Updated on

ENG vs NZ 1st Test 16 Wickets Fall on Day 1 as Ollie Robinson Rocks Lord's

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन याने लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलत क्रिकेट विश्वात नवा इतिहास रचला आहे. रॉबिन्सनने आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकात तीन बळी घेण्याचा पराक्रम केला. १४९ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी अद्भूत कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या काईल जेमिसन याने घेतलेल्या ५ बळींच्या घातक माराच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. इंग्लंड एवढ्या कमी धावसंख्येवर बाद झाल्यामुळे सामन्यात न्यूझीलंडचे पारडे जड वाटत होते, मात्र ऑली रॉबिन्सनच्या कातिलाना गोलंदाजीने इंग्लंडचे सामन्यात दमदार पुनरागमन करून दिले.

न्यूझीलंडच्या डावातील दुसरे आणि स्वतःचे पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या रॉबिन्सनने आपल्या धारदार गोलंदाजीने किवी संघाचा कणाच मोडून काढला. त्याने या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेवोन कॉनवेला पायचीत पकडले. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे अनुभवी केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांना बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने ६ गडी गमावून ६१ धावा केल्या असून, ते अजूनही इंग्लंडच्या धावसंख्येपेक्षा ७९ धावांनी मागे आहेत. रॉबिन्सनने आतापर्यंत ६ षटकांत अवघ्या १० धावा देत ४ बळी घेतले असून, त्याने डॅरेल मिचेलच्या रूपाने आपला चौथा बळी मिळवला.

लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी धोकादायक

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना 'क्रिकेटची पंढरी' मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी या खेळपट्टीवर फलंदाजांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे मिळून एकूण २०१ धावा झाल्या आणि तब्बल १६ गडी बाद झाले. ही आकडेवारी पाहता हा सामना तीन दिवसांपेक्षा जास्त काळ चालेल असे वाटत नाही. त्यामुळे लॉर्ड्सच्या या खेळपट्टीवर आगामी काळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खेळाच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा डाव लवकरात लवकर गुंडाळून ५ बळी घेण्याचा ऑली रॉबिन्सनचा मुख्य प्रयत्न असेल.

जगातील सातवा गोलंदाज

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपल्या स्पेलमधील पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा ओली रॉबिन्सन हा जगातील एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा नुवान जोयसा, भारताचा इरफान पठाण, न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी, पाकिस्तानचा हॅरिस सोहेल, तसेच ऑस्ट्रेलियाचे स्कॉट बोलंड आणि मिचेल स्टार्क यांनी हा पराक्रम केला आहे. मात्र, या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारा तो पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे.

या विक्रमाचा इतिहास पाहिला तर, श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज नुवान जोयसा याने १९९९ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामन्यात डावातील दुसऱ्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली होती. हा कारनामा करणारा तो जगातील पहिला गोलंदाज होता. भारताचा इरफान पठाण याने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत डावाच्या पहिल्याच षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर सलमान बट्ट, युनिस खान आणि मोहम्मद युसूफ यांना बाद करून ऐतिहासिक हॅटट्रिक नोंदवली होती, जी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे.

इतर गोलंदाजांचा पराक्रम

या यादीतील इतर गोलंदाजांचा विचार केल्यास, न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरीने बांगलादेशविरुद्ध डावातील १० व्या षटकात, तर पाकिस्तानच्या हॅरिस सोहेलने श्रीलंकेविरुद्ध २६ व्या षटकात हा पराक्रम साधला होता. ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडने आणि मिचेल स्टार्कने वेस्ट इंडिजविरुद्ध अनुक्रमे डावातील सहाव्या आणि पहिल्याच षटकात तीन-तीन फलंदाजांना बाद करून वेस्ट इंडिजच्या फलंदाजीवर कहर सुचवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news