ENG vs IND Test match : ऐतिहासिक विजयातील भारतापुढील पाच आव्हाने

ENG vs IND Test match : ऐतिहासिक विजयातील भारतापुढील पाच आव्हाने

भारतीय संघ एक जुलैपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. गेल्यावर्षी मालिकेतील स्थगित झालेला हा सामना आहे. या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. सप्टेंबर 2021 मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे मालिकेतील पाचवा सामना होऊ शकला नाही. त्यावेळी रद्द झालेला सामना आता बर्मिंगहॅममध्ये खेळण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारताने हा सामना अनिर्णीत जरी राखला, तरी मालिका भारताच्या नावावर होईल. जर हा सामना जिंकला, तर मालिकेत 3-1 ने विजय मिळेल. भारतीय संघ इंग्लंडमध्ये आतापर्यंत एका मालिकेत दोनपेक्षा अधिक सामने जिंकलेला नाही. जर हा सामना भारताने जिंकला, तर इतिहास घडणार आहे. परंतु, भारताच्या या पराक्रमाच्या आड इंग्लंडचे पाच खेळाडू दिवार बनून आडवे येऊ शकतात.

जॉनी बेअरस्टो

जॉनी बेअरस्टोच्या अंगातील आयपीएलचे वारे अजून कमी झालेले नाही. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धुवाँधार फलंदाजी करून इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. 2019 ते 2021 या काळात एकही कसोटी शतक न करणार्‍या बेअरस्टोने यंदा तीन शतकांसह पाचशेहून अधिक धावा केल्या आहेत.

बेन स्टोक्स

नवीनच कर्णधार बनलेल्या बेन स्टोक्स हा जगातील अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू मानला जातो. गेल्यावर्षी तो मालिकेत नव्हता; परंतु यावेळी तो संघात आला आहे. न्यूझीलंडविरुद्ध चार डावांत त्याने 176 धावा केल्या आहेत. तो गोलंदाजीतही भारतीय फलंदाजांना त्रासदायक ठरू शकतो.

जेम्स अँडरसन

काही लोकांसाठी वाढते वय हा फक्त एक आकडा असतो. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा त्यापैकी एक. तो 39 वर्षांचा झाला असला, तरी त्याच्या नावापुढे विक्रमांचा कॉलम भरतच आहे. कसोटीत त्याने 650 विकेटस् घेतल्या आहेत. त्याच्या सीम आणि स्विंगचा फलंदाजांकडे कोणताही उतारा नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने 11 विकेटस् घेतल्या आहेत. कसोटीत सर्वात जास्त विकेटस् त्याने भारताविरुद्धच घेतल्या आहेत, हीच सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.

जो रूट

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येत असतील तर तो आहे, जो रूट. त्याने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. या मालिकेतील पूर्वार्धात पहिल्या चार सामन्यांत भारताला त्याने सर्वाधिक दमवले आहे. त्याने 94 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंडविरुद्ध चार डावांत 373 धावा नोंदवल्या.

ओली रॉबिनसन

वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसन दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळला नाही. परंतु, भारताविरुद्ध तो आता नव्या दमाने पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेत त्याने 4 कसोटींत 21 विकेटस् घेऊन भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रास दिला आहे. मालिकेत सर्वाधिक विकेटस् त्याच्याच नावावर आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news