

कैरो : भारताचे अव्वल पॅरा-बॅडमिंटनपटू प्रमोद भगत व सुकांत कदम यांनी इजिप्त येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावले. दोघांनी आपापल्या एकेरीच्या गटात सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर एकत्र येत दुहेरीच्या स्पर्धेतही विजेतेपद मिळवले.
‘एसएल-3’ पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रमोद भगतने आपलाच राष्ट्रीय सहकारी उमेश विक्रम कुमारवर मात केली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत पहिला गेम 19-21 असा गमावल्यानंतर भगतने पुढील दोन्ही गेम अनुक्रमे 21-15 आणि 21-13 अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तासाभरापेक्षा जास्त चाललेल्या या सामन्यात भगतचा अनुभव आणि कौशल्याचा बराच कस लागला.
‘एसएल-4’ पुरुष एकेरी गटात सुकांत कदमने सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्याच सूर्यकांत यादवचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. दोन्ही गेममध्ये शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली, ज्यात कदमने अनुक्रमे 27-25 आणि 21-18 अशा फरकाने विजय मिळवला.
‘एसएल-3’ गटामध्ये खेळाडू उभे राहून खेळतात, परंतु त्यांना पायांच्या हालचालींमध्ये किंवा संतुलनामध्ये अडथळे असतात. ‘एसएल-4’ गटामध्ये अडथळे तुलनेने कमी असतात.