ECB Financial Loss 2027 : भारत 'दौरा' नाही पैसाही नाही! इंग्लंड क्रिकेट बोर्डाला २०२७ मध्ये बसणार तब्‍बल ६२७ कोटींचा फटका

ICC कडून निधी रोखल्यानेही क्रिकेट बोर्डसमोर मोठे आर्थिक संकट
ECB financial loss 2027
प्रतिकात्‍मक छायाचित्र.
Published on: 
Updated on: 

ECB financial loss 2027 : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) २०२७ मध्ये प्रचंड आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे नुकसान तब्बल ५ कोटी पौंड म्हणजेच भारतीय रुपयांत सुमारे ६२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. उन्हाळ्याच्या हंगामात पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धची अ‍ॅशेस मालिका होणार असली, तरी भारतीय संघाचा दौरा नसल्याने बोर्डाच्या कमाईला मोठा सुरुंग लागणार आहे.

भारताचा दौरा नसल्याचा मोठा आर्थिक फटका

ब्रिटनमधील दैनिक 'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, 'ईसीबी'च्या या संभाव्य मोठ्या नुकसानामागे दोन मुख्य कारणे आहेत.पहिले मुख्य कारण म्हणजे प्रसारमाध्यम हक्कांपासून (Media Rights) मिळणारे उत्पन्न. हे उत्पन्न कोणत्या देशाचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर येतो, यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. २०२७ मध्ये भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार नसल्याने ईसीबीच्या कमाईत मोठी घट निश्चित मानली जात आहे. जगभरातील क्रिकेट अर्थकारणात भारतीय प्रेक्षक आणि टीव्ही प्रसारणाला सर्वाधिक महत्त्व असल्याने, भारतीय दौरा नसणे हा कोणत्याही बोर्डासाठी मोठा धक्का असतो.

आयसीसीकडून निधी रोखण्याचा निर्णय

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घेतलेला एक मोठा निर्णय. आयसीसी २०२७ मध्ये आपल्या सदस्य देशांना वाटप करावयाच्या ब्रॉडकास्ट महसुलातील काही हिस्सा रोखणार आहे.२०२५ मध्ये ईसीबीला १२.६ दशलक्ष पौंडांचा नफा झाला होता. परंतु, त्याच वेळी बोर्डाने २०२७ मध्ये मोठ्या नुकसाची शक्यता वर्तवली होती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, प्रत्यक्ष नुकसान सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजापेक्षा खूप जास्त असू शकते.

ECB financial loss 2027
England Cricket : इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ, जो रूट पुन्हा बनला ‘कॅप्टन’; स्टीफन फ्लेमिंग नवे मुख्य प्रशिक्षक

नुकसान कमी करण्यासाठी धडपड

दरम्यान, आयसीसीने रोखलेल्या रकमेचा प्रभाव कमी करण्यासाठी ईसीबी प्रयत्नशील आहे. आयसीसीने नेमकी किती रक्कम रोखली आहे याची अधिकृत आकडेवारी अजून जाहीर केलेली नाही. त्यामुळे हे नुकसान ३५ दशलक्ष पौंड (सुमारे ४३९ कोटी रुपये) पर्यंत मर्यादित ठेवता येईल, असा विश्वास ईसीबीला वाटतो.तसेच २०२७ या आर्थिक वर्षाचा कालावधी ३१ जानेवारी २०२८ पर्यंत असल्याने, ईसीबीकडे नवीन व्यावसायिक करार आणि इतर माध्यमांतून अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी अद्याप वेळ उपलब्ध आहे.

आयसीसी सदस्य देशांचे पैसे का रोखणार?

२०२८ पासून सुरू होणाऱ्या पुढील सायकलसाठी ब्रॉडकास्ट कराराची रक्कम कमी मिळण्याची शक्यता असल्याने आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांतील कमाईतील घसरण एकदम बसू नये, यासाठी आयसीसीने सर्व १२ पूर्ण सदस्यांच्या वाट्याची काही रक्कम आत्ताच रोखण्याचा मार्ग निवडला आहे. सहसा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वर्ष असल्याने सायकलच्या शेवटच्या वर्षात बोर्डांना आयसीसीकडून मोठा निधी मिळतो, मात्र यावेळेस चित्र वेगळे असेल.

ECB financial loss 2027
IPL Controversy | 'आयपीएल'मुळे माझे क्रिकेट करीअर संपले : इंग्लंडचा माजी कर्णधाराचा गौप्यस्फोट

काउंटी क्रिकेटवरही कोसळणार संकट?

जागतिक क्रिकेटमधील इतर मंडळांप्रमाणेच इंग्लंड बोर्डही भारतीय टीव्ही प्रेक्षक आणि प्रायोजकत्वावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ईसीबीचा 'सोनी पिक्चर्स'सोबतचा सहा वर्षांचा करार १८५ दशलक्ष पौंड (सुमारे २,३२३ कोटी रुपये) मूल्याचा आहे. हा करार २०२८ मध्ये संपत असून, यापुढील नवा करार कमी रकमेचा असण्याची शक्यता आहे. ईसीबीला होणाऱ्या या प्रचंड नुकसानाचा थेट फटका इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटला बसू शकतो. सध्याच्या आकडेवारीनुसार, १८ पैकी १० काउंटी क्लब आधीच घाट्यात चालले आहेत. काउंटी क्लब आपल्या वार्षिक महसुलासाठी थेट ईसीबीवर अवलंबून असल्याने, बोर्डाच्या आर्थिक संकटाची झळ स्थानिक क्रिकेटलाही बसण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.