

WCL 2025
बर्मिंगहॅम : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (WCL) स्पर्धेकडे डोळे लावून बसलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित मानला जाणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. भारतीय खेळाडूंनी देशहिताला प्राधान्य देत या सामन्यातून माघार घेतल्यानंतर आयोजकांना हा निर्णय घेणे भाग पडले. आयोजकांनी याबद्दल जाहीर माफी मागितली आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सुरेश रैना आणि शिखर धवन यांसारख्या प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. त्याने आयोजकांना ११ मे रोजी पाठवलेला ईमेल शेअर करत म्हटले की, "पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय ११ मे रोजी आयोजकांना कळवण्यात आला होता. पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा विचार करून घेण्यात आला आहे." भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही हीच भूमिका घेतल्याचे समजते.
केवळ खेळाडूंनीच नव्हे, तर स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेल्या 'EaseMyTrip' या ट्रॅव्हल-टेक कंपनीनेही पाकिस्तानबाबत आपली भूमिका अत्यंत कठोर ठेवली. कंपनीने एक निवेदन जारी करत म्हटले की, दोन वर्षांपूर्वी WCL सोबत ५ वर्षांचा करार केला असला तरी, पाकिस्तानचा समावेश असलेल्या कोणत्याही सामन्याशी आम्ही संबंधित राहणार नाही. आम्ही 'इंडिया चॅम्पियन्स' संघाला अभिमानाने पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पाकिस्तानचा समावेश असलेल्या सामन्याला आम्ही समर्थन देणार नाही, ही भूमिका सुरुवातीपासूनच आयोजकांना स्पष्ट करण्यात आली होती.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) मान्यतेने होणारी ही स्पर्धा १८ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान बर्मिंगहॅम, नॉर्थम्प्टन, लेस्टर आणि लीड्स येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेत क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानावर आपले कौशल्य दाखवणार आहेत.