

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri) यांचे आज गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही दिवस संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या आवडीने त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये काम केले. मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी करताना २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह एकच षटकार हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. त्यात संझगिरी हे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते.
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून सर्वच वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी दुःख व्यक्त केले आहे. ''द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. ३८ वर्षांची मैत्री, त्यांच्यासोबत अनेक आठवणी शेअर केल्या आहेत आणि असा कोणीतरी ज्याने खूप सुंदर, शैलीत लिहिले आहे. जेव्हा त्याने एखाद्या गोष्टीबद्दल लिहिले तेव्हा तुम्ही त्याची कल्पना करू शकता. त्याला लवकर घेऊन जाण्यासाठी धमकावणाऱ्या शक्तींविरुद्ध किती हा संघर्ष! ही अशाच एका प्रकारची रियरगार्ड अॅक्शन होती ज्याबद्दल तो खूप भावनिकतेने लिहू शकला असता. त्याने लेखनशैली समृद्ध केली.'' अशा शब्दांत भोगले यांनी संझगिरी यांच्याविषयी X वरील पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत.
संझगिरी यांच्या निधनाबद्दल राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनीही दुःख व्यक्त केले आहे. ''साहित्याच्या विविध प्रकारातून क्रिकेट जगताची ओळख प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीला करून देणारे प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट समीक्षण क्षेत्रातील एक तारा निखळून गेला.'' अशा शब्दांत सरनाईक यांनी संझगिरी श्रद्धांजली वाहिली आहे.
कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडा विश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संझगिरी यांना आदरांजली वाहिली. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, असे पवार पुढे म्हणाले.
बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष आशीष शेलार यांनी संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना, क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचे ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटर्स, क्रिकेट विक्रमांचे इनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंगांचे अचूक विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी यांच्या निधनाने पत्रकारितेची मोठी हानी झाली.
त्यांनी ३ डिसेंबर रोजी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली होती. ''मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या पंधरा दिवसात माझ्या हातून लिखाण झालं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे वजन कमी झाल्याने माझे स्नायू सुद्धा कमी झाले. आणि एका जागी एका पोझिशनमधे बसणं कठीण जातं. त्यामुळे तीन गोष्टी झाल्यात. एकाग्रता कमी झाली आहे, वाचन आणि लिखाण कमी झालंय.'' असे संझगिरी यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.