19 वर्षीय मुशीरने रचला इतिहास! सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Duleep Trophy Mushir Khan Record : 373 चेंडूत 181 धावांची ऐतिहासिक खेळी
Duleep Trophy Mushir Khan
दुलीप ट्रॉफीमध्ये 19 वर्षीय मुशीर खानने सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Duleep Trophy Mushir Khan : भारतीय क्रिकेटपटू सरफराज खानचा भाऊ मुशीर खान याने दुलीप ट्रॉफीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दुलीप ट्रॉफीचा पहिलाच सामना खेळताना या 19 वर्षीय फलंदाजाने जबरदस्त खेळी करत अविस्मरणीय शतक झळकावले. या खेळीसह त्याने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडीत काढला. भारत अ संघाविरुद्ध फलंदाजी करताना मुशीरने 181 धावा ठोकल्या. या खेळीमुळे भारत ब संघाने पहिल्या डावात 321 धावांपर्यंत मजल मारली.

94 धावांत 7 विकेट पडल्या होत्या

या सामन्यात भारत ब संघ प्रथम फलंदाजी करण्यास उतरला, पण त्यांचा डाव गडगडला आणि 94 धावांत 7 विकेट गमावल्या. उर्वरीत फलंदाजही झटपट माघारी परतणार असे वाटत असताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीर खानने खेळपट्टीवर बराच वेळ संघर्ष केला आणि आठव्या क्रमांकावर आलेल्या नवदीप सैनीसह संघाचा डाव सावरला.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशीर 227 चेंडूत नाबाद 105 धावा करून परतला. यावेळी संघाची धावसंख्या 7 बाद 202 धावा झाली होती. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मुशीरने पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आणि नवदीप सैनीच्या साथीने 8व्या विकेटसाठी 204 धावांची अप्रतिम भागीदारी केली. दरम्यान, मुशीरनेही आपली धावसंख्या 150 च्या पुढे नेली. सरफराजचा धाकटा भाऊ पदार्पणाच्या सामन्यात द्विशतक झळकावण्याच्या मार्गावर होता तेव्हा कुलदीप यादवने त्याला बाद केले. अशा प्रकारे मुशीरची ही ऐतिहासिक खेळी संपुष्टात आली. नवदीप सैनीनेही अर्धशतक झळकावत मुशीर खानला चांगली साथ दिली.

सचिन तेंडुलकरचा विक्रम उद्ध्वस्त

दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात मुशीरला द्विशतक झळकावता आले नसले तरी त्याने 181 धावांच्या खेळीने सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांचा विक्रम मोडला. मुशीरने 373 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या डावात 16 चौकार आणि 5 षटकार मारले आणि दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात तिसरी सर्वोच्च धावासंख्या करणारा किशोरवयीन (20 वर्षाखालील) खेळाडू बनला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने जानेवारी 1991 मध्ये दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात गुवाहाटी येथे पूर्व विभागाविरुद्ध पश्चिम विभागाकडून फलंदाजी करताना 159 धावा केल्या होत्या. आता मुशीरने सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

दुलीप ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात किशोरवयीन खेळाडूंमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम बाबा अपराजितच्या नावावर आहे. बाबाने 212 धावा केल्या होत्या. यानंतर यश धुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 193 धावांची खेळी केली. या दोन खेळाडूंनंतर मुशीरने आता या विशेष यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले आहे.

मुशीर त्याच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठत आहे. आतापर्यंत त्याने 7 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 203 धावा आहे. आतापर्यंत त्याने रेड बॉल फॉरमॅटमध्ये 11 डावांमध्ये 64.54 च्या सरासरीने 710 धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news