

New BFI President Dr Rakesh Mishra Indian Boxing News
नवी दिल्ली : भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाची (आयएबीएफ) सर्वसाधारण सभा रविवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वाच्या बैठकीत देशभरातील २७ राज्ये, ६ केंद्रशासित प्रदेश आणि ५ क्रीडा मंडळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत डॉ. राकेश मिश्रा यांची फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ २०२५ ते २०२९ पर्यंत असेल.
डॉ. राकेश मिश्रा यांनी अध्यक्ष झाल्यानंतर लगेचच संघटनात्मक कामांना गती दिली. त्यांनी नवीन कार्यकारिणी, विविध समित्या आणि आयोगांसाठी नामांकित अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा केली. तसेच २०२५-२६ वर्षासाठी बॉक्सिंग क्रीडा दिनदर्शिका देखील तयार करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. मिश्रा यांनी सांगितले की, अनेक राज्यांनी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात रस दाखवला आहे. अशा आयोजकांना आयएबीएफकडून २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, केंद्र सरकारच्या ७५:२५ योजनेअंतर्गत, त्यांना एक आधुनिक बॉक्सिंग रिंग, ५० जोड्या हातमोजे, हेड गियर, संगणक स्कोअरिंग मशीन आणि चार डिजिटल वजन यंत्रे देखील प्रदान केली जातील, असेही ते म्हणाले.
श्रीलंकेतील कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या आशियाई अंडर-२२ आणि युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली. भारतीय संघाने एक सुवर्ण, सहा रौप्य आणि दहा कांस्यपदके जिंकली. या संघात १९ बॉक्सर, २ प्रशिक्षक, २ व्यवस्थापक, ५ तांत्रिक अधिकारी आणि ४ अधिकारी होते. पाच तांत्रिक अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतही भाग घेतला होता. डॉ. मिश्रा यांनी या कामगिरीबद्दल संपूर्ण संघाचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात भारतीय बॉक्सिंग जागतिक स्तरावर अधिक मजबूत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.