

MS Dhoni-Virat Kohli Viral Video
रांची: भारतीय क्रिकेट संघ सध्या रांचीमध्ये आहे. भारतीय संघ ३० नोव्हेंबर रोजी जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामना खेळणार आहे. याच निमित्ताने भारतीय संघाचे दोन दिग्गज, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांची खास भेट झाली.
रांचीमध्येच घर असलेल्या धोनीने गुरुवारी विराट कोहली आणि ऋषभ पंतला आपल्या घरी डिनरसाठी बोलावले होते. रात्री डिनर संपल्यानंतर, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच दिसणारा एक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
डिनरनंतर महेंद्रसिंग धोनीने स्वतः गाडी चालवत विराट कोहलीला हॉटेलवर सोडले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी गाडी चालवत आहे, तर विराट कोहली पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आणि त्याच्यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या खेळाडूचे हे 'रीयुनियन ऑफ द इयर' म्हणून वर्णन केले जात आहे. विराट कोहलीने धोनीच्याच नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, त्यामुळे त्यांच्यातील संबंध नेहमीच खास राहिले आहेत.
लंडनहून नुकताच परतलेला विराट कोहली बराच काळानंतर रांचीमध्ये सामना खेळणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो मुलाच्या जन्मामुळे संघाबाहेर होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत केएल राहुलकडे संघाची धुरा आहे. कर्णधार शुभमन गिल (मानेच्या दुखापतीमुळे) आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर (दुखापतग्रस्त) यांच्या अनुपस्थितीमुळे राहुलला नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही खेळत आहेत. दोन प्रमुख फलंदाज बाहेर असल्याने, या दोन अनुभवी खेळाडूंवर संघाच्या फलंदाजीची आणि मालिकेतील विजयाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.