

Denmark Open badminton 2026 : भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंची पराभवाची मालिका डेन्मार्क ओपनमध्येही कायम राहिली आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेत किदाम्बी श्रीकांत आणि तन्वी शर्मा यांनी पुढील फेरीत मारलेली धडक भारतासाठी दिलासादायक ठरली आहे.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जर्मनीच्या यवोन लीविरुद्ध सिंधूने दमदार सुरुवात केली. पहिला सेट २१-१३ अशा फरकाने सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली; मात्र ली हिने २५-२३ अशा फरकाने हा सेट जिंकला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये सिंधू १९-१५ अशी आघाडीवर होती आणि तिला पुढील फेरीत जाण्यासाठी केवळ दोन गुणांची गरज होती. मात्र, तिला ते दोन गुण मिळवता आले नाहीत. हातात आलेला सामना सिंधूच्या हातातून निसटला. अखेर लीने तिसरा सेट २१-१९ असा जिंकत सामना आपल्या नावे केला.
डेन्मार्क ओपनमध्येही लक्ष्यची या वर्षातील खराब कामगिरी कायम राहिली. चायनीज तैपेईच्या चोऊ तिएन-चेनविरुद्धच्या सामन्यात लक्ष्यने पहिला सेट २१-१८ असा जिंकून चांगली सुरुवात केली होती. मात्र, चेनने शानदार पुनरागमन करत त्याला २१-१३ आणि २१-१५ असे पराभूत केले आणि स्पर्धेतून बाहेर काढले. या वर्षी पहिल्याच फेरीत बाहेर पडण्याची ही त्याची आठवी वेळ आहे. 'ऑल इंग्लंड ओपन'च्या अंतिम फेरीत धडक मारल्यापासून त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे.
या स्पर्धेत अनुभवी किदाम्बी श्रीकांत आणि तन्वीने अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या स्पर्धांमध्ये भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. श्रीकांतने फ्रान्सच्या अर्नॉड मर्कलचा २२-२०, २१-१९ असा सरळ सेटमध्ये पराभव करत शानदार विजय मिळवला. पुढील फेरीत त्याला कठीण आव्हानाचा सामना करावा लागणार आहे, जिथे तो जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या ॲलेक्स लॅनिएरशी भिडणार आहे. तन्वीने नत्सुकीविरुद्धचा पहिला सेट २१-१७ असा जिंकून उत्कृष्ट सुरुवात केली. त्यानंतर नत्सुकीने जोरदार पुनरागमन करत दुसरा सेट २१-१६ असा जिंकला. तरीही, अखेरीस निर्णायक सेट २१-१९ असा जिंकत तन्वीने सामना आपल्या नावे केला.