CSKvsPBKS : पंजाबचा विजयी भांगडा

CSKvsPBKS : पंजाबचा विजयी भांगडा

Published on

मुंबई : वृत्तसंस्था

पंजाबच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्करलेल्या चेन्नईने अखेर यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांचा डाव उण्यापुर्‍या 126 धावांत आटोपला. त्यामुळे 54 धावांनी खणखणीत विजय संपादलेल्या पंजाबच्या खात्यात चार गुण जमा झाले. गतविजेत्या चेन्नईची पाटी कोरीच राहिली आहे. रविवारचा दिवस चेन्नईचा नव्हता हेच खरे.

181 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. चौदा धांवात त्यांचे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड तंबूत परतले. तिथूनच चेन्नईच्या डावाला उतरती कळा लागली. पायाच ढिसाळ असल्याचा तो परिणाम ठरला. उथप्पाने 13 धावा केल्या, तर गायकवाड याला एका धावेवरच समाधान मानावे लागले. त्याला कागिसोे रबाडाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. त्यानंतरही चेन्नईची पडझड थांबली नाही. पिंच हिटर असलेल्या मोईन अली याला भोपळाही फोडता आला नाही. वैभव अरोरा याने त्याचा त्रिफळा उडवला. उथप्पा हाही वैभवचाच बळी ठरला. चेन्नईची अवस्था तेव्हा 3 बाद 22 अशी दयनीय झाली होती.

कर्णधार रवींद्र जडेजा हाही शून्यावर बाद झाला. अर्शदीप सिंग याने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. 7.3 षटकांचा खेळ झालेला असताना अंबाती रायुडू याला तंबूचा रस्ता धरावा लागला. वैयक्तिक 13 धावांवर त्याला ओडीन स्मिथने जितेश शर्माकरवी झेलबाद केले. अशाप्रकारे अवघ्या 36 धावांत चेन्नईचा निम्मा संघ गारद झाला. वैभव अरोरा, दीपक चहर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा आणि ओडीन स्मिथ या पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि योग्य दिशा राखून सुरेख मारा केला. त्यामुळे चेन्नईची फलंदाजी लटपटली. 11 षटकांत त्यांनी पाच बाद 61 अशी मजल मारली होती. त्यावेळी चेन्नईला सामना जिंकण्यासाठी प्रतिषटक 14 धावांची सरासरी आवश्यक होती. अशा स्थितीत डावखुर्‍या शिवम दुबे याने 26 चेंडूंत अर्धशतक साजरे केले.

दुसर्‍या बाजूने महेंद्रसिंग धोनी याला मात्र धावा करताना रखडावे लागत होते. धोनीने शिवम दुबे याला फलंदाजीची जास्तीत जास्त संधी देण्याचे तंत्र अवलंबले होते. त्याच वेळी धोकादायक बनत चाललेल्या दुबे याला लिव्हिंगस्टोनने अर्शदीप सिंगमार्फत झेलबाद केले. दुबेने 30 चेंडूंत 57 धावा कुटताना 6 चौकार व 3 षटकार खेचले. 14.5 षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा चेन्नईची स्थिती 6 बाद 98 अशी झाली होती. पाठोपाठ ड्वेन ब्राव्हो याला लिव्हिंगस्टोनने स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपले. लागोपाठच्या चेंडूंवर त्याने ही करामत करून दाखवली. आता पराभव चेन्नईच्या अंगणात येऊन ठेपला होता.

त्यापूर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीसाठी पंजाबला आमंत्रित केले. पंजाबने निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या. पंजाबची सुरुवात सनसनाटी झाली. कर्णधार मयंक अग्रवाल अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. पाठोपाठ भानुका राजपक्षे हाही धावबाद झाला. ख्रिस जॉर्डन याने अप्रतिम थ्रो करून त्याला तंबूत पाठवले. मात्र त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन आणि शिखर धवन या जोडीने चेन्नईच्या गोलंदाजीवर जबरदस्त हल्लाबोल केला. विशेषतः लिव्हिंगस्टोन याने सुनामीसारख्या फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. त्याला वैयक्तिक 45 धावांवर अंबाती रायुडूने जीवदान दिले. 9.1 षटकांतच पंजाबने शंभर धावांचा टप्पा गाठला. दरम्यान, 24 चेंडूंत 33 धावा फटकावून धवन तंबूत परतला. रवींद्र जडेजाने त्याला ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर छान टिपले. धवनने चार चौकार व एक षटकार हाणला.

मग चेन्नईला हैराण करून सोडलेल्या लिव्हिंगस्टोन याला रवींद्र जडेजाने अंबाती रायुडूच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. 33 चेंडूंत 60 धावांची तुफानी खेळी करताना त्याने पाच चौकार ठोकले आणि पाच वेळा चेंडू प्रेक्षकांत भिरकावला. पंजाबने पहिल्या दहा षटकांत शंभरहून अधिक धावा केल्या, पण नंतरच्या सहा षटकांत त्यांची पीछेहाट झाली. त्यांचे तीन गडी यादरम्यान तंबूत परतले. त्यामुळे पंजाबची धावगती मंदावली. जितेश शर्माने 26 तर शाहरूख खानने 6 धावा केल्या. ओडीन स्मिथ हाही कमाल दाखवू शकला नाही. त्याने अवघ्या 3 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

  • किंग्ज पंजाब : 20 षटकांत 8 बाद 180
  • चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत सर्वबाद 126

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news