

CSK Khaleel Ahmed Injury IPL 2026
चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) यंदाच्या आयपीएल हंगामात सर्व पाच सामने खेळलेला संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज खलील अहमद आता उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही. १४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) झालेल्या सामन्यादरम्यान त्याच्या उजव्या खुब्यामध्ये वेदना जाणवू लागल्या होत्या. आता या दुखापतीमधून सावरण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात खलीलने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. आयपीएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही 'ग्रेड २' स्तराची दुखापत (Tear) असून, यातून सावरण्यासाठी किमान १० ते १२ आठवड्यांचा कालावधी लागेल. त्याने भारतासाठी ११ एकदिवसीय आणि १८ टी-२० सामने खेळले आहेत.
दुसरीकडे, सलग दुसरा विजय मिळवल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने समाधान व्यक्त केले आहे. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ३२ धावांनी मात केली. या विजयानंतर ऋतुराज म्हणाला की, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या सीएसकेचा संघ आता हळूहळू लयीत येत आहे. सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सवर २३ धावांनी विजय मिळवल्यानंतर, केकेआरला नमवून गुणतालिकेत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. सामन्यानंतर बोलताना गायकवाड म्हणाला, "मला वाटते की संघ आता हळूहळू सावरतोय. प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका नीट समजली आहे. कोणती षटके टाकायची आणि कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करायची, हे स्पष्ट आहे.
"आम्ही २२० धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते, मात्र १९२/५ ही धावसंख्या देखील पुरेशी ठरली. पहिल्या ७-८ षटकांनंतर खेळपट्टीचे स्वरूप पूर्णपणे बदलले. चेंडू वळायला लागला आणि काहीसा थांबून येऊ लागला. त्यामुळे १९० धावांचा टप्पा गाठल्यानंतर आम्हाला फक्त पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करायची होती, असेही ऋतुराज सांगितले. सीएसकेच्या या विजयात अफगाणिस्तानचा फिरकीपटू नूर अहमद याने मोलाचा वाटा उचलला. त्याने ४ षटकांत केवळ २१ धावा देऊन ३ बळी टिपले आणि केकेआरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.