Cristiano Ronaldo Portugal vs Spain, Nations League 2025 Final |
पोर्तुगाल : जर्मनीतील म्युनिक येथे झालेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला हरवून पोर्तुगालने नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामना जिंकल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डोला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो मैदानावरच रडू लागला. अलायन्झ अरेना येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये युरो चॅम्पियन्सचा पराभव करून पोर्तुगालने दुसरे नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले.
सामना अतिरिक्त वेळेपर्यंत २-२ असा असताना पोर्तुगालने पेनल्टी शूटआउटमध्ये सर्व पाच गोल करून स्पेनला ५-३ असे हरवले. रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला सामन्यात बरोबरी साधून दिली होती. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत गेला. स्पेन अंतिम फेरीत जिंकण्याचा प्रबळ दावेदार होता पण पोर्तुगालने पेनल्टी शूटआउटमध्ये चांगली कामगिरी करत स्पेनला हरवले. अंतिम फेरीत रोनाल्डोचा गोल हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १३८ वा गोल होता. या गोलसह, तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी आणि सुनील छेत्री यांच्यापेक्षा खूप पुढे गेला आहे.
स्पेनला हरवून पोर्तुगाल नेशन्स लीग चॅम्पियन बनल्यानंतर रोनाल्डो मैदानावरच रडू लागला. "तुम्हाला माहिती आहे मी किती वयाचा आहे. अर्थात, मी सुरुवातीपेक्षा शेवटाच्या जवळ आहे, पण मला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा लागेल. जर मला गंभीर दुखापत झाली नाही, तर मी खेळत राहीन," असे रोनाल्डोने विजयानंतर माध्यमांना सांगितले.
या सामन्यात सुरुवातीला स्पेनने आघाडी घेतली होती. २१व्या मिनिटाला मार्टिन जुबिमेन्दीने लॅमिन यामालच्या पासवर गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर ४५ व्या मिनिटाला पेड्रीच्या अप्रतिम पासवर मिकेल ओयार्झाबालने स्पेनसाठी दुसरा गोल केला. मात्र त्यानंतर लगेचच पाच मिनिटांत नुनो मेंडेसने गोल करत २-२ अशी बरोबरी साधली. अतिरिक्त वेळेत सामना अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघांना पेनल्टी शूटआउटमध्ये जावे लागले. स्पेनचा अल्वारो मोराटा, जो रियल माद्रिदमध्ये रोनाल्डोसोबत खेळला होता, तो एकमेव शूटआउटमध्ये चुकला, त्यामुळे पोर्तुगालला विजेतेपद मिळाले.