

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा पहिला टी-20 सामना 8 विकेट्स राखून जिंकला. या विजयासह सूर्यसेनेने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बुधवारी (22 जानेवारी) कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि त्यानंतर फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. सलामीवीर अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 79 धावा फटकावल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी योग्य ठरवला. इंग्लंडचा संघ 20 षटकांत 132 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांसह 68 धावा केल्या. इंग्लंडच्या फक्त तीन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. बटलरशिवाय इतर कोणताही फलंदाज प्रभावित करू शकला नाही.
या सामन्यासाठी भारताने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला नव्हता, परंतु अर्शदीप सिंगने जबाबदारी घेतली आणि सुरुवातीला पाहुण्या संघाला दोन धक्के देऊन भारताला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर वरुणने तीन, तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
133 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी तुफानी सुरुवात केली.
सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार कामगिरी करत अवघ्या 20 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने सॅमसन आणि सूर्यकुमारच्या विकेट लवकर गमावल्या, पण अभिषेकने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली आणि भारताची धावसंख्या 90 धावांच्या पुढे नेली.
सॅमसनला बाद केल्यानंतर आर्चरने त्याच षटकात भारताला दुसरा धक्का दिला. त्याने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सूर्याला खातेही उघडता आले नाही. सूर्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत खूप उंच गेला आणि फिल सॉल्टने तो यष्टीच्या मागे झेलला.
जोफ्रा आर्चरने संजू सॅमसनला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. सॅमसन चांगली फलंदाजी करत होता आणि अभिषेक शर्मासोबत त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. सॅमसन 20 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 26 धावा काढून बाद झाला.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नितीश रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.