RCB vs CSK : आरसीबीचे IPL च्या इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन! 17 वर्षांत कोणालाही…

RCB vs CSK : आरसीबीचे IPL च्या इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन! 17 वर्षांत कोणालाही…

पुढारी ऑनलाईन डेस्क : RCB vs CSK : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2024 मध्ये इतिहास रचला आहे. पहिल्या 7 पैकी 6 सामने गमावल्यानंतरही प्लेऑफसाठी पात्र ठरणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला आहे. स्पर्धेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे पुनरागमन ठरले आहे. आजपर्यंत आयपीएलमध्ये इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीच्या संघाने आयपीएलच्या 68 व्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन सीएसकेचा 27 धावांनी पराभव केला आणि प्ले ऑफची फेरी गाठली.

आयपीएल 2024 ची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी निराशाजनक झाली. पूर्वार्धात संघाला 7 पैकी 6 सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, तर 8व्या सामन्यातही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. एक वेळ अशी होती जेव्हा संघ गुणतालिकेत तळाच्या 10व्या क्रमांकावर फेकला गेला. आता हा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार असाच सर्वांचा दावा होता. मात्र, हे अंदाज चुकीचे ठरवत आरसीबीने संघाने अशी गती मिळवली की, पुढचे सलग सहा सामने जिंकून प्लेऑफचे तिकीट मिळवले.

यासह एका हंगामात सलग 6 पराभव पत्करून सलग 6 सामने जिंकणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे. आजपर्यंत कोणत्याही संघाला अशी लक्षवेधी कामगिरी करता आलेले नाही. याआधी 2010 मध्ये डेक्कन चार्जर्स हैदराबाद, 2020 मध्ये पंजाब किंग्ज आणि 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादने एका मोसमात सलग 5 सामने जिंकले होते आणि तेवढेच सामने गमावले होते.

आरसीबीने आयपीएलमध्ये दुस-यांदा विजयाची दुहेरी हॅट्ट्रिक पूर्ण केली आहे. यापूर्वी 2011 मध्ये बेंगळुरूने सलग 7 सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. त्या वर्षी हा संघ उपविजेता ठरला होता.

आरसीबीला यंदा हा विक्रम मोडण्याची संधी आहे. जर संघ प्लेऑफमध्ये प्रथम एलिमिनेटर आणि नंतर क्वालिफायर-2 जिंकण्यात यशस्वी ठरला तर त्यांच्या नावावर सलग 8 सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला जाईल. तर फायनल जिंकल्यास आरसीबी विजयाची तिहेरी हॅट्ट्रिक पूर्ण करेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news