

ढाका, वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला गैरवर्तन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. स्टम्पवर बॅट फेकून मारणे कर्णधार हरमनप्रीत कौरला चांगलेच महागात पडले आहे. अम्पायरशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिला आयसीसीने सक्त ताकीदही दिली आहे. हरमनप्रीत कौरला तिच्या मॅच फीच्या 75 टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच दोन गुणही कापले जातील.
हरमनप्रीत कौरच्या बाबतीत दिलेला पायचितचा निर्णय हा वादाचा विषय ठरला आहे. भारताच्या बांगला देश दौर्यातील शेवटचा एकदिवसीय सामना खूप वादग्रस्त ठरला. फलंदाजीदरम्यान बाद झाल्यावर हरमनप्रीत कौर भडकली. अम्पायरच्या चुकीच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तिने सामन्याच्या शेवटी प्रेझेंटेशन दरम्यान वादग्रस्त विधानही केले. त्यानंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे.
हरमनच्या या प्रतिक्रियेनंतर आयसीसीने तिला दंड ठोठावला आहे. तिला मॅच फीच्या 75 टक्के दंड भरावा लागेल. यासोबतच तिचे दोन गुणही वजा केले जातील. जर कोणत्याही खेळाडूने कोणत्याही सामन्याच्या अधिकार्याविषयी सार्वजनिकपणे टीका केली किंवा त्याची बदनामी केली तर तो 2.1.7 च्या आयसीसीच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग मानला जातो.
प्रेझेंटेशननंतरही 'तू-तू, मैं-मैं'
सामना संपल्यानंतर तिने प्रेझेंटेशनदरम्यान एक विधानही केले की, पुढच्या वेळी बांगला देशला येण्यापूर्वी संघालाही अशा अम्पायरिंगला सामोरे जावे लागेल, हे आम्ही लक्षात ठेवू आणि त्याची मानसिक तयारी करू. याशिवाय दोन्ही संघांचा ट्रॉफीसह फोटो काढण्यात येत असताना हरमनने 'फोटोमध्ये पंचांनाही बोलवा' अशी शेरेबाजी केली होती. यावर बांगला देशच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुलतानाने टीका केली आहे. ती म्हणाला की, भारतीय कर्णधाराने शिष्टाचाराने बोलायला हवे होते. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली कृती करून दाखवू शकली असती. क्रिकेट हा शिस्तीचा आणि आदराचा खेळ आहे. प्रत्येकाला वागण्या-बोलण्याचे भान हवे.