

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या क्रीडा चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कप आणि युरो कपच्या रूपात मेजवानी मिळत आहे. यातच आता कोपा अमेरिकाचा तडका मेजवानीला मिळाला आहे. कोपा अमेरिकाच्या पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्या अर्जेंटिनाने दुबळ्या कॅनडाचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
टी-20 वर्ल्ड कप आणि युरो कप पाठोपाठ कोपा अमेरिका स्पर्धेची दमदार सुरूवात झाली आहे. आज (दि.21) सकाळी झालेल्या कोपा अमेरिकाच्या सलामीच्या सामन्यात विश्वविजेत्या अर्जेंटिनाने दुबळ्या कॅनडाचा 2-0 गोल फरकाने पराभूत करून विजयी सलामी दिली. स्पर्धेतील अ गटातील पहिला सामना अर्जेंटिना आणि कॅनडा यांच्यात अटलांटामधील मर्सिडीज-बेंझ स्टेडियमवर खेळवण्यात आला.
सुरूवातीपासूनच अर्जेंटिनाने सामन्यावर आपले वर्चस्व राखले. परंतु, कॅनडाच्या बचावापुढे गोलची नोंद करण्यासाठी सामन्यात अर्जेंटिनाला संघर्ष करावा लागला. सामन्याच्या सुरूवातीपासून अर्जेंटिनाने वेगवाग चाली रचत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कॅनडाच्या खेळाडूंनी केलेल्या बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. तर, अर्जेंटिनाच्या भकक्म बचावापुढे कॅनडाचा निभाव लागला नाही. दोन्ही संघाना गोल न करता आल्यामुळे पहिल्या हाफमध्ये स्कोअर 0-0 बरोबरीत राहिला.
दुसऱ्या हाफच्या सुरूवातीपासून दोन्ही संघांनी गोल करण्याच्या इराद्याने आक्रमक सुरूवात केली. सामन्याच्या 49 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ज्युलियन अल्वारेझने मैदानी गोल करत अर्जेंटिनाचे खाते उघडले. यानंतर अर्जेंटिनाने आपले आक्रमक वाढवले. यानंतर शॉट पासिंगचा अवलंब करत अर्जेंटिनाने आक्रमक चाली रचल्या परंतु, अर्जेटिनाच्या आघाडी फळीला फिनिंशग करता न आल्याने गोल होवू शकला नाही.
अर्जेटिनाच्या गोलच्या बरोबरी करण्यासाठी कॅनडाने चढाया रचल्या. परंतु, अर्जेटिनाचा भक्कम बचावामुळे कॅनडाला गोल करण्यात यश आले नाही. दरम्यान, अर्जेंटिनाने उत्तम पासिंग करत सामन्यावर वर्चस्व ठेवत कॅनडाला गोलची परतफेड करण्याची संधी दिली नाही. सामन्याच्या शेवटच्या मिनिटात अर्जेंटिनाने चढायांचा वेग वाढवला. याचा त्यांना सामन्याच्या 88वा मिनिटाला फायदा झाला. त्यांच्या लॉटारो मार्टिनेझने गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाच्या गोलची परतफेड न करता आल्यामुळे त्यांना सामन्यात 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला.