

पुढारी ऑनलाईन डेस्क : UPI Down IP Connection : इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामने क्रिकेटप्रेमींना एक थरारक सस्पेन्स थ्रिलर चित्रपटासारखा आनंद आणि उत्साह देत असताना, दुसऱ्या बाजूला ही स्पर्धा भारताच्या बँकिंग प्रणालीसाठी एक तांत्रिक आव्हानांच्या हंगामात रूपांतरित झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे. या स्पर्धेदरम्यान चालणाऱ्या कायदेशीर आणि बेकायदेशीर बेटिंगमुळे बँकांच्या आयटी पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येत असल्याचे तज्ञांनी निरिक्षण नोंदवले आहे.
आयपीएल हे मनोरंजनाचा तडका आणि क्रिकेटचा थरार यांचं अनोखं मिश्रण आहे. दरवर्षी लाखो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा एक अद्वितीय क्रीडा सोहळा बनला आहे. दरम्यान आयपीएल सामन्यांवर ऑनलाईन ॲपद्वारे सट्टा लावणा-यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या आर्थिक व्यवहारांसाठी सट्टेबाजांकडून UPIचा वापर होत आहे. परिणामी युपीआयद्वारे होणा-या आर्थिक व्यवहारांमुळे भारतीय बँकांवर ताण येऊ लागल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय मीडिया अहवालांनुसार, भारतात दरवर्षी IPL दरम्यान सुमारे 100 अब्ज डॉलर्स (सुमारे 8.30 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीचे बेकायदेशीर बेटिंग होते. हे बेटिंग प्रामुख्याने परदेशी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरून केले जाते. हे परदेशी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स भारतीय नागरिकांना सेवा देण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि 'म्यूल अकाउंट्स' (Mule Accounts) चा वापर करतात.
ड्रीम11 आणि प्रोबो सारख्या कायदेशीररित्या कार्यरत फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्सला भारतात झपाट्याने लोकप्रियता मिळत आहे. या प्लॅटफॉर्म्सद्वारे वापरकर्ते सामन्यांवर प्रत्यक्ष पैशांद्वारे बेटींग लावतात. या बेटिंग व्यवहारांसाठी UPI चा वापर केला जात आहे. यामुळे बँकांवरचा ताण वाढला आहे. बँकांना UPI नेटवर्कद्वारे तात्काळ आणि सुरक्षित व्यवहार सुनिश्चित करावे लागतात.
भारताची UPI प्रणाली ही जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम डिजिटल पेमेंट प्रणाली बनली आहे. या प्रणालीद्वारे दरवर्षी सुमारे 3 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स (अंदाजे 250 लाख कोटी रुपये) इतक्या मूल्याचे व्यवहार केले जातात. सध्या सुरू असलेल्या IPL 2025 हंगामात व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यामुळे बँकाच्या सर्व्हरवर अतिरिक्त भार येत असून UPI प्रणाली वापरण्यामध्ये तांत्रिक अडचण येण्याचे प्रमाण वाढत आहे.
'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCI) प्रत्येक महिन्याला बँकांच्या 'फेल्युअर रेट'चा अहवाल प्रसिद्ध करते. ग्राहकांनी आपले खाते कोणत्या बँकेत ठेवावे हे ठरवण्यासाठी हा अहवाल उपयोगी ठरतो.
बँकांची डिजिटल कार्यक्षमता आणि सायबर सुरक्षेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देखील कठोर भूमिका घेत आहे. त्यामुळे, अनेक बँका आणि वित्तीय संस्था तांत्रिक समस्या टाळण्यासाठी बिग डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अॅनालिटिक्स संस्थांची मदत घेत आहेत. बेंगळुरूस्थित VuNet Systems सारख्या स्टार्टअप्स दररोज सुमारे 1 अब्ज व्यवहारांचे निरीक्षण करतात आणि 50 टेराबाईट्स डेटावर प्रक्रिया करून वेळेत समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामुळे सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी मदत होते.