Commonwealth Games : ग्लास्गो राष्‍ट्रकुल स्‍पर्धेला आजपासून सुरुवात, ७४ देशांतील ३ हजारांहून अधिक खेळाडू नशीब आजमावणार

नीरज चोप्रा, मिराबाई चानू सुवर्णपदकासाठी सज्ज : ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंगवर भारताची मदार
Commonwealth Games India
Published on
Updated on

ग्लास्गो : क्रीडा जगताचे लक्ष लागून राहिलेल्या २३ व्या राष्ट्रकुल खेळांचा थरार आजपासून (दि. २३) स्कॉटलंडमधील ग्लास्गो शहरात सुरू होत आहे. तब्बल ७४ देशांतील सुमारे ३ हजारांहून अधिक खेळाडू या क्रीडा महाकुंभातील १० विविध खेळांमध्ये आपले नशीब आजमावतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री १०.३० वाजता ‘ओव्हो हायड्रो’ येथे होणाऱ्या दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने या स्पर्धेचे बिगुल वाजणार आहे. त्‍यापूर्वी भारताच्या मोहिमेची सुरुवात आज दुपारी २.०० वाजल्यापासून ‘लॉन बॉल्स’च्‍या सामन्‍याने होईल.

खर्च कपातीमुळे यंदा कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस यांसारख्या भारताच्या हक्काच्या खेळांना स्पर्धेतून वगळण्यात आले आहे. गेल्या २०२२ च्या बर्मिंगहॅम स्पर्धेत भारताने जिंकलेल्या ६१ पदकांपैकी २५ पदके याच चार खेळांतील होती. त्यामुळे यंदा भारताची संपूर्ण मदार प्रामुख्याने ॲथलेटिक्स, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या तीन खेळांवर असेल. ॲथलेटिक्समध्ये भारताने सर्वाधिक ३२ खेळाडूंचे पथक उतरवले आहे. यंदाच्या मोहिमेत सुवर्णपदकासाठी नीरज चोप्रा व मिराबाई चानू यांच्यावर भारताची प्रामुख्याने भिस्त असेल.

मागील ‘राष्‍ट्रकुल’मध्‍ये भारताला ६१ पदके; यंदा निम्म्यावर येण्याची भीती!

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याने वाढत्या खर्चामुळे आयोजनातून माघार घेतल्याने, ग्लास्गोने अत्यंत कमी बजेटमध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे. मात्र, यासाठी मोठी छाटणी करण्यात आली असून, क्रीडा प्रकारांची संख्या १९ वरून थेट १० वर आणण्यात आली आहे. या क्रीडा कपातीचा सर्वाधिक फटका भारताला बसणार आहे. वगळण्यात आलेल्या ९ खेळांमध्ये भारताचे पारंपरिक वर्चस्व असलेले खेळ समाविष्ट आहेत.

२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ६१ पदके जिंकली होती. त्यापैकी तब्बल २८ पदके कुस्ती (६ सुवर्णांसह १२ पदके), बॅडमिंटन (६ पदके), टेबल टेनिस (७ पदके), हॉकी (२ पदके) आणि महिला क्रिकेट (१ पदक) या खेळांमधून आली होती. हे सर्व हक्काचे खेळ यंदा पूर्णपणे वगळण्यात आल्यामुळे भारताला यंदा ३० पदकांचा टप्पा ओलांडण्यासाठीही कमालीचा संघर्ष करावा लागणार आहे.

सांगता समारंभात रश्मिका, शंकर महादेवन यांचा जलवा

यंदाच्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेचा सांगता समारंभ २ ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि दिग्गज गायक-संगीतकार शंकर महादेवन हे असतील. या दिमाखदार सोहळ्यात भारताकडे अधिकृतपणे २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद सोपवले जाईल. २०३० ची राष्‍ट्रकुल स्‍पर्धा अहमदाबादमध्‍ये खेळवली जाणार आहे.

‘ती’ परंपरा अबाधित राहणार का?

गेल्या दोन दशकांपासून (२००२ मँचेस्टर गेम्सपासून) प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत पदतालिकेत अव्वल पाचमध्ये राहण्याचा भारताचा ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. मात्र, यंदा भारताला ज्‍या खेळात अधिक पदके मिळतात, ते खेळच समाविष्‍ट नसल्‍याने हा रेकॉर्ड राखणे भारतासाठी ‘अग्निपरीक्षा’ ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news