Club World Cup : रियल माद्रिदची उपांत्यपूर्व फेरीत धडक

युव्हेंटसवर निसटत्या फरकाने मात; गोंझालो गार्सियाचा एकमेव गोल ठरला निर्णायक
Real Madrid victory Club World Cup
Published on
Updated on

Real Madrid Club World Cup quarter finals

फ्लोरिडा : स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेच्या पुनरागमनाने उत्साहित रियल माद्रिदने फिफा क्लब वर्ल्डकपमध्ये बलाढ्य युव्हेंटसला 1-0 ने पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. सामन्याच्या उत्तरार्धात गोंझालो गार्सियाने केलेला हेडरवरील गोल सामन्यात निर्णायक ठरला. येथील हार्ड रॉक स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रियल माद्रिदने मारलेली ही बाजी सनसनाटी ठरली.

पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत रंगली. युव्हेंटसने सुरुवातीला आक्रमक खेळ करत रियल माद्रिदच्या बचावफळीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रियलचा गोलरक्षक थिबॉट कोर्टुआने काही उत्कृष्ट बचाव करत त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरवले. यानंतर रियल माद्रिदने सामन्यावर हळूहळू पकड मिळवली. ज्युड बेलिंगहॅम आणि फेडेरिको व्हॅल्व्हर्डे यांनी युव्हेंटसच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले; पण त्यांना यश आले नाही.

वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यात यश

दुसर्‍या सत्रात रियल माद्रिदने आपले वर्चस्व कायम ठेवले. अखेर सामन्याच्या 54 व्या मिनिटाला त्यांना यश मिळाले. ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डने दिलेल्या अचूक क्रॉसवर गोंझालो गार्सियाने शानदार हेडर मारत चेंडूला जाळीचा रस्ता दाखवला आणि संघाला 1-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रियल माद्रिदचा हुकमी एक्का, किलियन एम्बाप्पे याचे आजारपणातून सावरून मैदानात झालेले पुनरागमन. सामन्याच्या 68 व्या मिनिटाला तो बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला, तेव्हा उपस्थित 62,000 हून अधिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.

झाबी अलोन्सोच्या मार्गदर्शनाखाली खेळणार्‍या रियल माद्रिदने सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत स्पर्धेत आपली घोडदौड कायम ठेवली. यानंतर रियल माद्रिदचा उपांत्यपूर्व सामना आता बोरुसिया डॉर्टमंड आणि मेक्सिकोच्या मॉन्टेरी यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news