
पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 Auction : ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारख्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग (IPL) मेगा लिलाव 2025 पूर्वी रिलीज करण्यात आले आहे. आता हे तीन खेळाडू कोणत्या ना कोणत्या फ्रँचायझी संघाचे कर्णधार बनू शकतात. यामध्ये महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ ऋषभ पंतला आपल्या कॅम्पमध्ये सामील करू शकतो, असे मीडिया रिपोर्ट्स समोर आले आहेत. ज्यावर चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आता एक मोठी अपडेट दिली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ विश्वनाथन यांनी माजी सीएसके खेळाडू अंबाती रायडू यांच्याशी संवाद साधताना सांगितले, ‘आम्ही सीएसकेची रिटेंशन यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याशी दीर्घ चर्चा केली. संघाला पुढे नेण्याची क्षमता कोणत्या खेळाडूंमध्ये आहे याबाबत आम्ही स्पष्ट होतो. रिटेन केलेले खेळाडू सीएसकेला पुढे नेण्यात सक्षम आहेत. गायकवाड, जडेजा, धोनी, शिवम दुबे आणि मथिशा पाथिराना यांना रिटेन करणे खूप सोपे होते. पण आम्हाला माहीत होतं की आम्ही सगळ्यांना कायम ठेवलं तर आमच्याकडे लिलावात जास्त पैसे राहणार नाहीत. लिलावादरम्यान भारताचे सर्वोत्कृष्ट खेळाडू जेव्हा येतील तेव्हा आम्ही त्या ठिकाणी स्पर्धा करू शकणार नाही, याचीही जाण होती. आम्ही अजूनही प्रयत्न करू पण मला वाटत नाही की आम्ही पंतला विकत घेऊ शकू.’
ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्स संघाने रिलीज केले. गेल्या मोसमापर्यंत दिल्लीचे प्रशिक्षक असलेले रिकी पाँटिंग सध्या पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक झाले आहेत. अशा स्थितीत पाँटिंग पुन्हा एकदा ऋषभ पंतला आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट करू शकतो, असे मानले जात आहे. पंजाबकडे पंतला देण्यासाठी भरपूर पैसे आहेत. त्यांच्या पर्समध्ये 110 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर CSK च्या पर्समध्ये फक्त 55 कोटी रुपये शिल्लक आहेत.