

पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions Trophy Team India Record : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपले आव्हान सादर करेल. विशेष म्हणजे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळले जाणार आहेत. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारतीय संघाविरुद्ध एकही सामना जिंकता आला नसलेल्या संघांबद्दल जाणून घेऊया.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामने जिंकले आहेत. 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा इंग्लंडशी सामना झाला. त्यावेळी टेम इंडियाने अवघ्या 5 धावांनी विजेतेपद पटकावले. बर्मिंगहॅममध्ये खेळला गेलेला सामना 20-20 षटकांचा होता, ज्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 129 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 बाद 124 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 4 सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. दोन्ही संघ शेवटच्या वेळी 2017 च्या स्पर्धेत आमनेसामने आले होते. त्यावेळी भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. यापूर्वी 2013 च्या स्पर्धेत भारताने प्रोटीज संघाला 26 धावांनी पराभूत केले होते. तर 2000 आणि 2002 च्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाने द. आफ्रिकेवर मात केली होती.
भारत-केनिया यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन लढती झाल्या आहेत. त्या दोन्ही सामन्यांत भारताने विजय मिळवला. 2000 मध्ये खेळल्या गेलेल्या आवृत्तीत भारताने केनियावर 8 गडी राखून विजय मिळवला होता. नैरोबी येथे झालेल्या सामन्यात भारताकडून सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी अर्धशतके झळकावली. त्यानंतर, 2004 च्या आवृत्तीत, साउथहॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारताने केनियाचा 98 धावांनी पराभव केला.
2017मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत उभय संघांमध्ये हा एकमेव सामना खेळला गेला आहे. आता 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ एकाच गटात आहेत. 20 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघा आमनेसामने येतील.
2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने झिम्बाब्वेवर 14 धावांनी मात केली होती. त्या सामन्यात भारताकडून मोहम्मद कैफने शतक झळकावले होते.