

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli in Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने धावांची आतषबाजी केली. त्याची शतकी आणि संघाला विजय मिळवून देणारी खेळी सर्वांसाठी संस्मरणीय ठरली. किंग कोहली 2009 पासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे, पण त्याला या मोठ्या स्पर्धेत शतक झळकावता आले नव्हते. अखेर रविवारी (दि. 23) झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यातच त्याने शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. दरम्यान, त्याने राहुल द्रविडला मागे टाकले असून आणि आता त्याच्या निशाण्यावर सौरव गांगुलीचा विक्रम आला आहे.
राहुल द्रविडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 19 सामन्यात 627 धावा केल्या आहेत. आता कोहलीने त्याला मागे टाकले असून त्याने 15 सामन्यांत 651 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील कोहलीची सरासरी 93 तर स्ट्राईक रेट 90.16 आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग कोहलीने नाबाद 100 धावांची खेळी साकारली.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 सामन्यांमध्ये 665 धावा केल्या आहेत. गांगुलीच्या पुढे जाण्यासाठी कोहलीला आता केवळ 15 धावांची गरज आहे. 2 मार्च रोजी खेळल्या जाणा-या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहली हा आकडा आरामात पार करून गांगुलीला मागे टाकेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ख्रिस गेल आहे. ज्याने 17 सामन्यांमध्ये 791 धावा केल्या. शिखर धवनने भारतासाठी 10 सामन्यांमध्ये सर्वाधिक 701 धावा केल्या आहेत. कोहलीने जर 50 धावा केल्या तर शिखर धवन पिछाडीस पडेल. भारतीय संघ आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे, त्यामुळे कोहलीला किमान दोन सामने तरी खेळायला मिळतील हे निश्चित आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्यावरून असे दिसते की तो आता पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. अशा परिस्थितीत, किमान 50 धावांची आणखी एक खेळी सहज साकारायला कोहलीसाठी अवघड नसेल.