

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs NZ Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. ही लढत रंजक असणार आहे. दोन्ही संघांमध्ये केवळ स्पर्धाच होणार नाही, तर गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉलसाठी प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या वर्षीच्या गोल्डन बॅट आणि गोल्डन बॉल जिंकण्याच्या शर्यतीत कोण-कोण आघाडीवर आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला गोल्डन बॅट प्रदान करून सन्मानित केले जाते. सध्या, इंग्लंडचा बेन डकेट गोल्डन बॅट जिंकण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. डकेटने 3 सामन्यात 227 धावा केल्या आहेत, पण इंग्लिश संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता भारत आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना डकेटला मागे टाकून गोल्डन बॅट जिंकण्याची संधी आहे.
न्यूझीलंडचा रचिन रवींद्र डकेटपेक्षा फक्त एका धावेने मागे आहे. त्याच्या खात्यात 3 सामन्यातून 226 धावा जमा झाल्या आहेत. त्याच वेळी, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 4 सामन्यांमध्ये 217 धावा केल्या आहेत. त्याचा देखील या शर्यतीत समावेश आहे. श्रेयस अय्यरने 4 सामन्यांमध्ये 195 धावा केल्या आहेत. त्याला धावांच्या बाबतीतही अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. याशिवाय, न्यूझीलंडचे केन विल्यमसन आणि टॉम लॅथम यांनीही अनुक्रमे 191 आणि 189 धावा केल्या आहेत. तेही गोल्डन बॅट जिंकण्याच्या जवळ आहेत.
227 धावा : बेन डकेट (इंग्लंड)
226 धावा : रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
225 : जो रूट (इंग्लंड)
217 धावा : विराट कोहली (भारत)
216 धावा : इब्राहिम झद्रान (अफगाणिस्तान)
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉल दिला जातो. या शर्यतीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आघाडीवर आहे. हेन्रीने आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताचा मोहम्मद शमी आहे, ज्याने 4 सामन्यात 8 विकेट मिळवल्या आहेत.
या यादीत मिस्ट्री फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे नावही समाविष्ट आहे. त्याने 2 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर देखील गोल्डन बॉलच्या शर्यतीत आहे. त्याच्या नावावर 4 सामन्यात 7 विकेट्स आहेत.
न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने या स्पर्धेत क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त फलंदाजीमध्येही आपले कौशल्य दाखवले आहे. त्याने 4 सामन्यांमध्ये 143 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट (140.20) सर्वाधिक आहे. त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (139.08) आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश इंगलिस (133.67) देखील या यादीत आहे.
अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह ओमरझाई स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 3 सामन्यांमध्ये 8 षटकार मारले आहेत. ग्लेन फिलिप्स 7 षटकारांसह संयुक्तपणे यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 5 तर, केएल राहुलने 4 आणि श्रेयस अय्यरने 3 षटकार मारले आहेत.