

पुढारी ऑनलाईन डेस्क : Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान संघाचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने बुधवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळताना इतिहास रचला. त्याने इंग्लिश गोलंदाजांची धु धु धुलाई करत 146 चेंडूत 177 धावांची धमाकेदार खेळी साकारली.
झद्रान हा एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला. त्याने पहिला 106 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांची मदत घेतली. तर 134 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. अखेर संघासाठी 300 धावांच्या टप्पा पार करून तो 177 धावांवर बाद झाला.
झद्रान हा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्हीमध्ये शतके करणारा पहिला अफगाणिस्तानी फलंदाज ठरला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात झद्रानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. आता त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात झद्रान सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने इंग्लंडच्या बेन डकेटचा विक्रम मोडला. डकेटने यंदाच्याच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 165 धावा केल्या होत्या.
झद्रानचा एकदिवसीय सामन्यातील 150 पेक्षा जास्त धावांचा दुसरा डाव होता. यापूर्वी त्याने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 162 धावा केल्या होत्या.
177 : इब्राहिम झद्रान विरुद्ध इंग्लंड, 2025
165 : बेन डकेट विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2025
145* : नॅथन अॅस्टल विरुद्ध अमेरिका, 2004
145 : अँडी फ्लॉवर विरुद्ध भारत, 2002
141* : सौरव गांगुली विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2000
141 : सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1998
141 : ग्रॅमी स्मिथ विरुद्ध इंग्लंड, 2009