

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Player Of The Month : इंग्लंड क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सनची जुलै महिन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी करून छाप पाडली होती. भारताचा वॉशिंग्टन सुंदर आणि स्कॉटलंडचा चार्ली कॅसल यांना मागे टाकत त्याने हा पुरस्कार जिंकला आहे. दुसरीकडे, महिलांमध्ये श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू हिला हा सन्मान मिळाला आहे.
26 वर्षीय ॲटकिन्सनने जुलैमध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कसोटी पदार्पणात 10 विकेट घेणारा तो 8वा गोलंदाज ठरला. त्या मालिकेत ॲटकिन्सनने 3 सामन्यात 16.22 च्या सरासरीने एकूण 22 बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता.
प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाल्यानंतर ॲटकिन्सनने आपले सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकांचे आभार मानले. तो म्हणाला, ‘आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकणे हा खरा सन्मान आहे. माझ्या कसोटी कारकिर्दीची अतुलनीय सुरुवात झाली आहे. इंग्लंडसोबतच्या माझ्या पहिल्या मालिकेत मला इतके यश मिळेल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझ्या संघसहकाऱ्यांचे, तसेच प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्सचे यांचे खूप खूप आभार मानतो.’
गेल्या महिन्यात सुंदरने झिम्बाब्वे संघाविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात 11.62 च्या सरासरीने 8 विकेट घेतल्या होत्या. तर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात त्याने फलंदाजी करताना 25 धावा आणि 2 बळी घेतले. पदार्पणाच्या सामन्यात स्कॉटलंडचा कॅसलही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. ओमान क्रिकेट संघाविरुद्धच्या त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात त्याने 7 विकेट्स (7/21) घेतल्या होत्या.
भारताच्या शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांना मागे टाकत श्रीलंकेच्या चमारा अटापट्टूने हा पुरस्कार जिंकला. अटापट्टूच्या नेतृत्वाखाली श्रीलंकन संघाने प्रथमच आशिया कप जिंकला. अटापट्टूने या स्पर्धेत 101.33 च्या सरासरीने 304 धावा केल्या. सलग दुसऱ्या महिन्यात हा पुरस्कार जिंकण्यापासून मानधना हुकली. तिला जून महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले होते.