

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : आगामी फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात कोणत्या वाहिनीवर दिसणार, या चिंतेत असलेल्या कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांसाठी अखेर एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आली आहे. ‘झी एंटरटेन्मेंट’ने आपल्या चार नव्या स्पोर्टस् वाहिन्यांची घोषणा केली असून, विश्वचषकाच्या थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगच्या हक्कांसाठी थेट आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाशी बोलणी सुरू केली आहेत. येत्या 11 जूनपासून या महाकुंभाला सुरुवात होत आहे.
प्रक्षेपणाचा पेच सुटण्याची चिन्हे
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये 11 जूनपासून सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत प्रक्षेपण हक्क अद्याप कोणाकडेही नव्हते. त्यामुळे भारतीय चाहते या स्पर्धेला मुकणार का, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ‘झी’ने ऐनवेळी या शर्यतीत उडी घेत चाहत्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. फिफाने यापूर्वी 2026 आणि 2030 च्या विश्वचषकासाठी भारतीय बाजारपेठेतून 100 दशलक्ष डॉलर्स मिळवण्याची अपेक्षा ठेवली होती. परंतु, अमेरिकेत होणाऱ्या सामन्यांच्या वेळेतील फरकामुळे करारात अडचणी येत होत्या. आता ‘झी’ केवळ 2026 च्या आवृत्तीसाठी कमी किमतीत हा करार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्ल्डकप समोर ठेवत चार नव्या क्रीडा वाहिन्यांची घोषणा
क्रीडा क्षेत्रात धमाका करण्यासाठी ‘झी’ने एकाच वेळी चार वाहिन्या लाँच केल्या आहेत. यामध्ये ‘युनायटेड 8 स्पोर्टस् 1’ आणि ‘युनायटेड 8 स्पोर्टस् 1 एचडी’ या हिंदी वाहिन्यांचा, तर ‘युनायटेड 8 स्पोर्टस् 2’ आणि ‘युनायटेड 8 स्पोर्टस् 2 एचडी’ या इंग्रजी वाहिन्यांचा समावेश आहे. या वाहिन्यांसाठी आवश्यक असलेल्या नियामक परवानगीसाठी कंपनीने आधीच अर्ज केले आहेत. या वाहिन्यांवर फुटबॉलसह क्रिकेट, कबड्डी, बॅडमिंटन आणि कुस्ती यांसारखे खेळ पहायला मिळू शकतात.