

मियामी; वृत्तसंस्था : स्टार फॉरवर्ड व्हिनिसियस ज्युुनिअरने केलेल्या दोन धडाकेबाज गोल्सच्या जोरावर ब्राझीलने फिफा वर्ल्डकप २०२६ मधील आपल्या अंतिम साखळी सामन्यात स्कॉटलंडचा ३-० असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह ब्राझीलने ‘ग्रुप सी’मध्ये अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
हार्ड रॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ब्राझीलने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला स्कॉटलंडच्या बचावात्मक चुकीचा फायदा घेत व्हिनिसियस ज्युुनिअरने पहिला गोल केला. त्यानंतर पहिल्या हाफच्या इंज्युरी टाईममध्ये (४५+ मिनिटाला) व्हिनिसियसने एक उत्कृष्ट हेडर मारत ब्राझीलची आघाडी २-० अशी मजबूत केली. उत्तरार्धात, ६० व्या मिनिटाला ब्रुनो गुइमारेसच्या पासवर मॅथ्यूस कुन्हाने तिसरा गोल करून स्कॉटलंडच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या. स्कॉटलंडच्या स्कॉट मॅकटोमिने आणि कीरन टियरनी यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले; पण ब्राझीलचा गोलरक्षक ॲलिसनने ते अपयशी ठरवले.
मियामी : ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने तब्बल ९८१ दिवसांनंतर (जवळपास ३ वर्षे) आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये अत्यंत भावनिक पुनरागमन केले आहे. स्कॉटलंडविरुद्ध या सामन्यात उत्तरार्धात नेमार मैदानात उतरताच स्टेडियममधील चाहत्यांनी उभे राहून त्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे ३४ वर्षीय नेमार प्रदीर्घ काळ मैदानाबाहेर होता. सामन्याच्या ७६ व्या मिनिटाला मुख्य प्रशिक्षक कार्लो अंसेलोटी यांनी त्याला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. पुनरागमनानंतर नेमार कमालीचा भावनिक झालेला पाहायला मिळाला. ‘३ वर्षांनंतर पुन्हा देशाची जर्सी परिधान करताना मला अत्यंत आनंद होत आहे, मी शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे,’ अशी भावना नेमारने सामन्यानंतर व्यक्त केली.