पुढारी ऑनलाईन डेस्क : yashasvi jaiswal : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शनिवारी पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चंगलाच समाचार घेतला. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अप्रतिम फलंदाजी करत कसोटी क्रिकेटमध्ये एक महान विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. यासह तो नवा 'सिक्सर किंग' ठरला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी षटकार ठोकण्याचा विक्रम यशस्वीने केला आहे. त्याने न्यूझीलंडचा माजी फलंदाज ब्रेंडन मॅक्युलमला मागे टाकले आहे.
नॅथन लायनने टाकलेल्या 52व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वीने षटकार ठोकून इतिहास रचला. त्याने 2024 मध्ये कसोटीत 34 षटकार ठोकले आहेत. त्याच्या आधी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमच्या नावावर होता. मॅक्युलमने 2014 मध्ये 33 षटकार मारले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि अष्टपैलू बेन स्टोक्स आहे. त्याने 2022 मध्ये 26 षटकार मारले होते.
34 : यशस्वी जैस्वाल (2024)*
33 : ब्रेंडन मॅक्क्युलम (2014)
26 : बेन स्टोक्स (2022)
22 : ॲडम गिलख्रिस्ट (2005)
22 : वीरेंद्र सेहवाग (2008)
22 वर्षीय यशस्वीने आणखी एक पराक्रम केला. भारतासाठी एका वर्षात 50 किंवा त्याहून अधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये तो सामील झाला आहे. यशस्वीच्या आधी फक्त सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सूर्यमार यादव आणि शुभमन गिल यांनीच अशी कामगिरी नोंदवली आहे. भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू 'हिटमॅन' रोहित शर्मा आहे. त्याने 2023 मध्ये 80 षटकार मारले होते.
80 : रोहित शर्मा (2023)
78 : रोहित शर्मा (2019)
74 : रोहित शर्मा (2018)
74 : सूर्यकुमार यादव (2022)
65 : रोहित शर्मा (2017)
58 : शुभमन गिल (2023)
56 : सूर्यकुमार यादव (2023)
51 : सचिन तेंडुलकर (1998)
50 : यशस्वी जैस्वाल (2024)*
यशस्वी आणि केएल राहुलने भारताला दुसऱ्या डावात दमदार सुरुवात करून दिली. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 57 षटकात एकही विकेट न गमावता 172 धावा केल्या. यशस्वीने 193 चेंडूंचा सामना करत नाबाद 90 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तर राहुलने 153 चेंडूत नाबाद 62 धावांची भर घातली आहे. सध्या त्याच्या बॅटमधून चार चौकार आले आहेत. 20 वर्षांनंतर भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात 100 प्लसची भागीदारी केली आहे. भारताच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 104 धावा केल्या होत्या.