

इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. लीग टप्प्यातील सर्व 70 सामने खेळले गेले आहेत आणि आता 23 मे पासून प्ले-ऑफ सामने सुरू होणार आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंटस् आयपीएल 2023 च्या प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.
'ई साला कप नामदे…! अर्थात यंदा कप आमचाच…' अशी टॅगलाईन असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पुन्हा एकदा आयपीएल जिंकता आले नाही. गुजरातविरुद्धच्या पराभवाने यंदाच्या मोसमातूनही त्यांचा पत्ता कट झाला. हा संघ दरवर्षी ज्या पद्धतीने खेळतो ते पाहता हा संघ कधीच चॅम्पियन होईल, असे वाटत नाही. आरसीबी संघात अशा अनेक मोठ्या उणिवा आहेत, ज्या गेल्या 16 वर्षांपासून त्याला चॅम्पियन बनण्यापासून रोखत आहेत. सिनेमात सगळे सुपरस्टार एकत्र घेतले तरी सिनेमा सुपरहिट होत नाही, तसे अनेक नामवंत खेळाडू असूनसुद्धा आरसीबीची 'हार'सीबी नेहमीच होते.
सलामी जोडी सुपरहिट
या हंगामात सर्वाधिक धावा करणार्यांच्या यादीत कोहली तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने या मोसमात 14 सामन्यांत 53.25 च्या सरासरीने आणि 139.82 च्या स्ट्राईक रेटने 639 धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅप आहे, त्याने 56.15 च्या सरासरीने आणि 153.68 च्या स्ट्राईक रेटने 730 धावा केल्या, पण तरीही आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर गेले.
फिनिशरची उणीव
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएल 2022 यांच्या हंगामाचा धडा घेतला नाही आणि 2023 च्या लिलावात सहा किंवा सातव्या क्रमांकासाठी कोणताही फिनिशर खरेदी केला नाही. गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिसने कबूल केले की संघात सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर स्फोटक खेळाडू नसल्यामुळे संघाची ही अवस्था झाली आहे. गेल्या हंगामात दिनेश कार्तिकने अनेक सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. यंदाही संघ त्याच्यावर अवलंबून होता, पण यंदा कार्तिकला गेल्या हंगामाप्रमाणे फलंदाजी करता आली नाही.
तिसर्या क्रमांकाचा गुंता
आरसीबीचा तिसर्या क्रमांकाचा फलंदाज रजत पाटीदार हंगामाआधी जखमी झाला होता. फाफ आणि विराटने सुरुवातीला खूप धावा केल्या, पण तिसर्या क्रमांकावर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी किंवा धावा करू शकला नाही. यादरम्यान महिपाल लोमरोर, अनुज रावत आणि शाहबाज अहमद यांच्यावर या सीक्वेन्सचा प्रयत्न करण्यात आला, पण ते सर्व फ्लॉप ठरले. आरसीबी व्यवस्थापनाने त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला तिसर्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पण, त्यामुळे मधली फळी खूपच कमकुवत झाली. म्हणजेच रजत पाटीदारची योग्य जागा शोधण्यात संघाला अपयश आले, हे त्याच्या अपयशाचे प्रमुख कारण होते.
चहलची उणीव; फिरकी प्रभावहीन
आरसीबीने आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी यजुवेंद्र चहलला सोडले होते. त्यानंतर त्यांचे फिरकीपटू इतर यशस्वी संघांप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. वानिंदू हसरंगाकडून संघाला खूप आशा होत्या, पण तो भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी दिसत नव्हता. न्यूझीलंडचा फिरकी अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलही काही अप्रतिम करू शकला नाही. आरसीबीला अनुभवी भारतीय फिरकीपटूची उणीव जाणवली.