

मुंबई : नुकतीच झालेली आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतीय संघाने लीलया जिंकली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर भारताला अजूनही आशिया चषक मिळाला नसला तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुमारे 100 कोटींचा फायदा झाला आहे. मात्र आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे मूल्यांकन सलग दुसऱ्या वर्षी घटले आहे.
मंडळाला यावर्षी 6700 कोटींच्या कमाईची अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या आर्थिक अहवालात या लाभासंदर्भात माहिती नमूद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवून आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. भारतीय संघाने मोहसीन नक्वी यांच्याकडून चषक स्वीकारण्यास नकार दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने ही भूमिका घेतली. यामुळे संतप्त झालेल्या नक्वी यांनी चषक आणि पदके सोबत घेतली. परिणामी, भारतीय संघाला चषक आणि पदकांशिवाय परतावे लागले.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये बीसीसीआयला 109.44 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. यामध्ये आशिया चषक यजमान शुल्क तसेच टी -20 विश्वचषक सहभाग शुल्कातून मिळालेल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे फायदे समाविष्ट आहेत. बीसीसीआयला 2025-26 आर्थिक वर्षात 6,700 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे, जो 2017-18 मध्ये त्यांनी कमावलेल्या 666 कोटी रुपयांपेक्षा दहा पट जास्त आहे.
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचे मूल्यांकन सलग दुसऱ्या वर्षी घटले आहे, जे सुमारे 16,000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटचा खर्च पुरुषांच्या तुलनेत 3.5 पट कमी झाला आहे.
बीसीसीआयच्या खर्चावर दृष्टिक्षेप टाकला तर, बोर्ड यावर्षी महिलांच्या देशांतर्गत क्रिकेटवर अंदाजे 96 कोटी खर्च करत आहे, जे महिला प्रीमियर लीगमधून मिळणाऱ्या नफ्याच्या 26 टक्के आहे. गेल्या हंगामात, मंडळाने महिला प्रीमियर लीगमधून सुमारे 350 कोटी कमावले. बीसीसीआय पुरुषांच्या देशांतर्गत क्रिकेटवर अंदाजे 344 कोटी खर्च करत आहे, ज्यामध्ये फक्त आयपीएलवर 111 कोटी खर्च केले जातात. महिला क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीसारखी देशांतर्गत स्पर्धाही नाही.