

पुढारी ऑनलाईन डेस्क : Cricket Match Fixing : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी (18 एप्रिल) टी20 मुंबई लीगमधील एका संघाचे मालक गुरमीत सिंह भामरा यांच्यावर मोठी कारवाई केली. मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचे ‘उल्लंघन’ केल्याबद्दल भामारा यांच्याअर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
बीसीसीआयचे लोकपाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी म्हटले की, मॅच फिक्सिंगसारख्या भ्रष्ट कृत्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. आम्ही भामरा यांना सर्वाधिक कठोर शिक्षा सुनावली आहे. एएनआयला प्राप्त झालेल्या बीसीसीआय लोकपालांच्या आदेशानुसार, हे प्रकरण मुंबई टी-20 लीगच्या दुसऱ्या हंगामातील एका सामन्याशी संबंधित आहे.
हा सामना मे 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या स्पर्धेचा उपांत्य सामना होता. आदेशात म्हटले आहे की भामरा यांनी एका खेळाडूशी संपर्क साधून मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न केला. त्या खेळाडूने नंतर हा प्रकार संबंधित यंत्रणांना कळवला. यापूर्वी, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास केला होता. तपासादरम्यान भामरा दोषी आढळले.
यानंतर हे प्रकरण लोकपाल यांच्याकडे पाठवण्यात आले. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप कायम ठेवण्यासाठी आणि गुरमीत सिंग भामारा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यासाठी सविस्तर युक्तिवाद केले. संघ मालकाचे कॅनडासह इतर देशांमधील क्रिकेट लीगशी व्यावसायिक संबंध असल्याचे वृत्त आहे.