

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने 2024-25 वर्षासाठी नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले. यामध्ये एकूण 34 खेळाडूंना चार श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. ग्रेड ए+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह बुमराह यांचा समावेश कायम आहे. त्याचबरोबर काही असे खेळाडूही आहेत ज्यांना पहिल्यांदाच सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची लॉटरी लागली आहे. यामध्ये नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, आकाश दीप आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. तसेच काही खेळाडू असेही आहेत; जे गेल्या वर्षी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग होते पण यंदा त्यांना बोर्डाने वगळले आहे. (BCCI Central Contracts Dropped Players)
भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तो आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळत नाहीय. त्यामुळे त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरने शेवटचा सामना डिसेंबर 2023 मध्ये भारतासाठी खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर गेला. तो अजूनही पुनरागमन करू शकलेला नाही. त्यामुळे त्याला 2024-25 च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीत स्थान देण्यात आलेले नाही. सध्या शार्दुल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळत आहेत.
आवेश खानने भारतासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शेवटचा सामना खेळला होता. सध्या तो आयपीएलमध्ये लखनऊ संघासाठी चांगली कामगिरी करत आहेत. आवेशने 2022 मध्ये भारतासाठी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 8 वनडे व 25 टी-20 सामने खेळले आहेत. तरीदेखील त्याला 2024-25 साठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
जितेश शर्माने 2024 मध्ये भारतासाठी पदार्पण केले. त्याने भारतासाठी 9 टी-20 सामने खेळले आहेत. पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे जितेश शर्माला कॉन्ट्रॅक्ट यादीबाहेर ठेवले जाणे जवळपास निश्चित होते, आणि अखेर तसेच झाले.
के. एस. भरत हे आणखी एक नाव आहे, ज्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून वगळले जाणे निश्चित मानले जात होते. तो एक स्पेशलिस्ट विकेटकीपर-फलंदाज म्हणून बराच काळ भारतीय संघात स्थान मिळवले होते, पण त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यालाही सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादीतून डच्चू देण्यात आला आहे.