

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Central Contract : बीसीसीआयने 2024-25 चा केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये, विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही ग्रेड-ए+ मध्ये कायम ठेवण्यात आले आहे, तर श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांचे पुनरागमन झाले आहे. गेल्या वेळी या दोघांना वगळण्यात आले होते. सध्याच्या केंद्रीय करारात एकूण 34 खेळाडूंचा समावेश आहे. कोणाला किती पैसे मिळतील ते जाणून घेऊया.
बीसीसीआय दरवर्षी वार्षिक केंद्रीय करार जाहीर करते, ज्यामध्ये एका वर्षात 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय किंवा 10 टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असतो. केंद्रीय करारांसाठी चार श्रेणी तयार केल्या आहेत. यामध्ये ग्रेड ए+ पहिला येतो. यानंतर ग्रेड ए, ग्रेड बी आणि ग्रेड सी येते.
बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या ग्रेड-ए+ मध्ये फक्त चार खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. ग्रेड-ए मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना 7 कोटी रुपये दिले जातात.
बीसीसीआयने ग्रेड-ए मध्ये फक्त 6 खेळाडूंना स्थान दिले आहे. यामध्ये मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. ग्रेड-ए मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना 5 कोटी रुपये दिले जातात. याचा सर्वाधिक फायदा पंतला झाला आहे. गेल्या वेळी त्याचा समावेश ग्रेड-बी मध्ये झाला होता. यावेळी त्याला ग्रेड-ए मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला 2 कोटी रुपयांचा फायदा मिळाला आहे.
श्रेयस अय्यरने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. त्याआधी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी कौशल्य दाखवले. आता बीसीसीआयने त्याला पुन्हा केंद्रीय करारात समाविष्ट केले आहे. त्याला ग्रेड-बी मध्ये संधी मिळाली आहे. त्याच्याशिवाय ग्रेड-बीमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल यांचा समावेश आहे. ग्रेड-बी मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना 3 कोटी रुपये दिले जातात.
ग्रेड-सी मध्ये, बीसीसीआयने एकूण 19 खेळाडूंना केंद्रीय करारात समाविष्ट केले आहे. या सर्वांना बीसीसीआयकडून प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले जातील. हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. या सर्वांचा समावेश ग्रेड-सी मध्ये करण्यात आला आहे.
ही आकडेवारी पगाराबद्दल झाली, पण यासोबतच सामना खेळण्यासाठी वेगळी मॅच फी देखील दिली जाते. बीसीसीआयने टी20 आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांसाठी वेगवेगळ्या फॉरमॅटनुसार मॅच फी निश्चित केली आहे.
वराट कोहलीचे उदाहरण पाहिल्यास विराटला वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. तर कसोटीसाठी 15 लाख, वनडे साठी 6 लाख तर टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात. यामध्ये आयपीएल सामन्यांचा समावेश नाही. त्याला लिलावात मिळणारी आणि आयपीएल सामना शुल्काची रक्कम वेगळीच आहे.
विराटने 2024 मध्ये 10 कसोटी सामने, 3 वनडे सामने आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. या हिशेबाने त्याला जवळपास वर्षाला 2.98 कोटी मॅच फीचे मिळाले आहेत. पण यातून कर कपात केली जाते.