पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २०२४-२५ हंगामासाठी टीम इंडियाच्या वरिष्ठ पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक करार जाहीर केले आहेत. हे केंद्रीय करार १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यानच्या कालावधीसाठी असतील. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचे ए प्लस ग्रेड खेळाडूंच्या यादीत स्थान कायम राहिले आहे. तर मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना ए ग्रेडमध्ये स्थान दिले आहे. सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांचा बी ग्रेड खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयने सोमवारी २०२४-२५ हंगामासाठी खेळाडूंचे केंद्रीय करार जाहीर केले. ज्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही वार्षिक कराराच्या यादीत अव्वल स्थान कायम ठेवले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या वर्षी यादीतून वगळलेले श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना यंदाच्या वार्षिक करारांमध्ये स्थान मिळाले.
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना अनुक्रमे ग्रेड बी आणि ग्रेड सी खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्यांना करारातून वगळण्यात आले होते. कारण त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावर बीसीसीआयने नाराजी व्यक्ती केली होती.
A+ ग्रेडमधील खेळाडूंच्या यादीत कोणताही बदल केलेला नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचे या यादीत स्थान कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आर. अश्विनला करारात स्थान दिलेले नाही.
सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, आकाश दीप, वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांचाही कराराच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.