Footballer Shot Dead : ‘बार्सिलोना’ क्लबच्या स्टार फुटबॉलपटूची गोळ्या झाडून हत्या; आईवरही प्राणघातक हल्ला

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिनेडावर बेछूट गोळीबार केला.
Footballer Shot Dead : ‘बार्सिलोना’ क्लबच्या स्टार फुटबॉलपटूची गोळ्या झाडून हत्या; आईवरही प्राणघातक हल्ला
Published on
Updated on

Barcelona SC club star footballer Mario Pineida shot dead in Ecuador

क्विटो : मैदानात आपल्या चपळाईने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या एका स्टार फुटबॉलपटूचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. इक्वेडोरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि 'बार्सिलोना एससी' (Barcelona SC) क्लबचा बचावपटू मारियो पिनेडा (Mario Pineida) याची बुधवारी (दि. १७) ग्वायाकिल शहरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्याने केवळ इक्वेडोरच नव्हे, तर जागतिक फुटबॉल क्षेत्र हादरून गेले आहे.

नेमकं काय घडलं?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय मारियो पिनेडा आपल्या कुटुंबीयांसह असताना हा हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पिनेडावर बेछूट गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात केवळ मारियोचा मृत्यू झाला नाही, तर हल्लेखोरांनी त्याच्या आईवर आणि सोबत असलेल्या आणखी एका महिलेवरही गोळ्या झाडल्या. या दोघींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

क्लबकडून शोक व्यक्त

मारियोच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या ‘बार्सिलोना एससी’ क्लबने 'X' वर पोस्ट करत दुःख व्यक्त केले आहे. ‘आमचा खेळाडू मारियो पिनेडा याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्याचे निधन झाले आहे, हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे,’ असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

अंमली पदार्थांची तस्करी आणि हिंसाचाराचा विळखा

इक्वेडोरमधील ग्वायाकिल हे बंदर शहर सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित टोळीयुद्धाचे केंद्र बनले आहे. या वर्षात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान या शहरात तब्बल १,९०० हत्या झाल्या आहेत. यादरम्यान अनेक खेळाडूही निशाण्यावर आले आहेत. गेल्या काही महिन्यांत इक्वेडोरमधील अनेक फुटबॉलपटूंवर हल्ले झाले आहेत. सप्टेंबरमध्ये तीन खेळाडूंनी जीव गमावला होता, तर ऑक्टोबरमध्ये ब्रायन अँग्युला हा खेळाडू अशाच एका हल्ल्यातून थोडक्यात वाचला होता.

मारियो पिनेडाची झळाळती कारकीर्द

मारियोने २०१८ आणि २०२२ च्या विश्वचषक पात्रता फेरीमध्ये इक्वेडोरच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो केवळ देशांतर्गत क्लबसाठीच नाही, तर २०२२ मध्ये ब्राझीलच्या प्रसिद्ध ‘फ्लुमिनेन्स’ (Fluminense) या क्लबसाठीही खेळला होता. तो मैदानातील त्याच्या आक्रमक बचावासाठी आणि चपळ हालचालींसाठी ओळखला जायचा.

तपास सुरू

इक्वेडोरचे गृह मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत असून, विशेष पोलीस पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहे. एकेकाळी लॅटिन अमेरिकेतील सर्वात सुरक्षित मानला जाणारा इक्वेडोर देश आता कोलंबिया आणि पेरू येथील कोकेन तस्करीचा मार्ग बनल्याने तिथे गुन्हेगारीने टोक गाठले आहे. एका महान खेळाडूचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सोशल मीडियावर ‘Rest in Peace Mario’ असे संदेश व्हायरल होत असून, चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news