

ढाका : आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) या स्पर्धेसाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या बीसीबीच्या अंतर्गत बैठकीत हा टोकाचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, २१ जानेवारीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशला स्पष्ट इशारा दिला होता की, जर त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली, तर ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला जाईल.
या निर्णयाची घोषणा करताना बीसीबीचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले की, आम्हाला विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे, पण भारतात खेळण्यास आमचा ठाम नकार आहे. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळल्याच्या घटनेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ही केवळ एक घटना नसून, भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) एकाधिकारशाहीचे ते निदर्शक असल्याचा आरोप त्यांनी केला.
बुलबुल म्हणाले, ‘आम्ही आयसीसीशी संवाद सुरू ठेवू. आम्हाला विश्वचषक स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे, पण आम्ही भारतात जाणार नाही. आयसीसीच्या बैठकीतील काही निर्णय धक्कादायक होते. मुस्तफिजुरचा मुद्दा हा केवळ वैयक्तिक विषय नव्हता, तर त्या निर्णयामागे केवळ भारताचाच हात होता.’
ते पुढे म्हणाले, ‘आमचे सामने भारताबाहेर हलवण्याची आमची विनंती आयसीसीने फेटाळली. जागतिक क्रिकेटची लोकप्रियता घटत चालली असून, बांगलादेशच्या २० कोटी जनतेला क्रिकेटपासून दूर ठेवणे हे आयसीसीचे अपयश आहे.’
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून वगळल्यानंतर बांगलादेशमध्ये भारतविरोधी सूर तीव्र झाला होता. त्यानंतर हा वाद अधिक विकोपाला गेला. बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत आपले सामने भारताबाहेर खेळवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते आणि स्थळ बदलण्याची विनंती फेटाळून लावली होती.
बांगलादेश सरकारनेही खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर, आपला संघ भारतात न पाठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. ‘आम्ही आमच्या खेळाडूंच्या सुरक्षिततेशी तडजोड करू शकत नाही,’ असे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशच्या या निर्णयामुळे आता सर्व नजरा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) लागल्या आहेत. पाकिस्तानने यापूर्वी वारंवार जाहीर केले होते की, जर बांगलादेशच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी माघार घेतली, तर पाकिस्तानही टी-२० विश्वचषक स्पर्धेवर बहिष्कार टाकेल. आता बांगलादेशने अधिकृत घोषणा केल्यानंतर पाकिस्तान आपल्या शब्दाला जागतो की माघार घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
बांगलादेशने माघार घेतल्यामुळे आयसीसी त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी देईल. स्कॉटलंड हा पात्र न ठरलेल्या संघांमध्ये सर्वोच्च मानांकित संघ आहे. जर आयसीसीने त्यांना पाचारण केले, तर इंग्लंड, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांचा समावेश असलेल्या 'गट क' मध्ये स्कॉटलंडचा समावेश होईल. अद्याप आयसीसीने स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाशी अधिकृत संपर्क साधलेला नाही, मात्र लवकरच याबाबत निर्णय अपेक्षित आहे.