ढाका : वरिष्ठ खेळाडूंनी पुकारलेल्या आक्रमक बंडासमोर नमते घेत बांगला देश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) गुरुवारी आपल्या वित्त समितीचे अध्यक्ष नजमुल इस्लाम यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. खेळाडूंबद्दल केलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील विधानामुळे खेळाडू आणि मंडळात मोठा संघर्ष निर्माण झाला होता.
खेळाडूंच्या संतापामुळे गुरुवारी बांगला देश प्रीमियर लीगमधील नोआखाली एक्स्प्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्स यांच्यातील सामन्याची नाणेफेक लांबणीवर पडली. दोन्ही संघांतील खेळाडू एकाच मागणीवर ठाम होते आणि जोपर्यंत नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत मैदानावर न उतरण्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता.
निर्धारित वेळेत दोन्ही संघ स्टेडियमवर पोहोचलेच नाहीत. खेळाडू आणि जनतेचा वाढता दबाव पाहून बीसीबीला अखेर कारवाई करणे भाग पडले. नजमुल इस्लाम यांची वित्त समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, ते बोर्डाचे संचालक म्हणून राहतील की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नजमुल इस्लाम यांनी खेळाडूंच्या मानधनावर भाष्य करताना त्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती आणि माजी कर्णधार तमीम इक्बाल यांना भारतीय एजंट म्हटले होते. या विधानांमुळे बांगला देशच्या क्रिकेट वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. खेळाडूंच्या या विजयामुळे बांगला देश क्रिकेटमधील खेळाडूंची संघटना अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.