

Bangladesh cricket controversy
ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. बोर्डाचे संचालक एम. नजमुल इस्लाम यांनी बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल याला 'इंडियन एजंट' म्हटल्यामुळे देशात मोठा गदारोळ निर्माण झाला. या विधानानंतर खेळाडू आणि चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याने अखेर बांगलादेश बोर्डाला बॅकफुटवर येत माफी मागावी लागली आहे.
भारत आणि बांगलादेश क्रिकेटमधील वाढता तणाव चर्चेद्वारे सोडवावा, असा सल्ला तमीम इक्बालने दिला होता. या सल्ल्यानंतर बोर्डाचे संचालक नजमुल इस्लाम यांनी तमीमवर 'इंडियन एजंट' असल्याची टीका केली होती. या विधानामुळे बांगलादेशच्या क्रिकेट विश्वात खळबळ माजली. सोशल मीडियावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाविरोधात मोहीम सुरू झाली.
वाढता विरोध पाहून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अधिकृत निवेदन जारी केले आहे. बोर्डाने म्हटले की, "एखाद्या संचालकाचे वैयक्तिक विधान म्हणजे बोर्डाची भूमिका असू शकत नाही. बोर्ड अशा विधानांचा निषेध करते जे आक्षेपार्ह किंवा कोणाच्या भावना दुखावणारे असतील. बोर्डाच्या अधिकृत प्रवक्त्याशिवाय कोणाचेही विधान बोर्डाचे मानले जाऊ नये." तसेच, खेळाडूंचा अपमान करणाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचा इशाराही बोर्डाने दिला आहे.
तमीम इक्बालने आपल्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले की, "बांगलादेश क्रिकेटचे हित आणि भविष्य लक्षात घेऊनच निर्णय घेतले पाहिजेत. जर चर्चेतून प्रश्न सुटत असतील तर त्यापेक्षा उत्तम काहीही नाही. आयसीसीकडून आपल्याला ९०-९५ टक्के निधी मिळतो, त्यामुळे भावनांपेक्षा फायद्याचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे."
नजमुल इस्लाम यांच्या विधानाचा केवळ चाहत्यांनीच नाही, तर सध्याच्या खेळाडूंनीही निषेध केला आहे. मोमिनुल हक, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी तमीमला पाठिंबा दिला आहे. 'क्रिकेट वेलफेयर असोसिएशन ऑफ बांगलादेश'ने संबंधित संचालकाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आयपीएल २०२६ पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजुर रहमानला रिलीज केल्यानंतर सुरू झाला. त्यानंतर बांगलादेशने सुरक्षेचे कारण देत टी-२० विश्वचषकातील आपले सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, भारतात कोणताही धोका नाही आणि बांगलादेशला त्यांचे सर्व सामने भारतातच खेळावे लागतील.