पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघाने आज (दि. ३) इतिहास घडवला. पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर पाणी पाजत बांगलादेशने दुसरी कसाटी ६ गडी राखून जिंकत मलिका २-० अशी जिंकली आहे. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ( Bangladesh vs Pakistan 2nd Test match )
रावळपिंडी स्टेडियमवर झालेल्या दुसर्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार शान मसूद, सॅम अयूब आणि आगा सलमान यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ धावांपर्यंत मजल मारली. बांगला देशच्या मेहदी हसन याने ५ बळी घेतले. पहिल्या डावात बांगलादेशची सुरुवात खराब झाली होती. तब्बल २६ धावांमध्ये ६ विकेट गमावल्या होत्या. यावेळी पाकिस्तान सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधणार,असा अंदाजही व्यक्त होत होता. ( Bangladesh vs Pakistan 2nd Test match )
बांगलादेश पराभवाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरु असतानाच लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांनी 165 धावांची भागीदारी करत सामन्यात पुनरागमन केले. लिटन दासचे शतक आणि मिराजच्या ७८ धावांच्या खेळीमुळे बांगलादेशने दुसऱ्या डावात २६२ धावापर्यंत पोहचला. पाकिस्तानला पहिल्या डावात केवळ १२ धावांचीच आघाडी मिळाली. पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 6 बळी घेतले. ( Bangladesh vs Pakistan 2nd Test match )
पाकिस्तानच्या फलंदाजांनी दुसर्या डावात हाराकिरी केली. अवघ्या १७२ धावांमध्ये पाकिस्तानचा संपूर्ण संघ तंबूत परतला. संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतकही करता आले नाही. बांगलादेशच्या हसन महमूदने ५ तर नाहिद राणाने ४ बळी घेत ऐतिहासिक कसाेटी मालिका विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. ( Bangladesh vs Pakistan 2nd Test match )
दुसर्या डावात बांगलादेशसमोर १७२ धावांचे लक्ष्य होते. बांगलादेशने ६ गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केले. दुसर्या डावात सलामीवीर झाकीर हसनच्या ४०, कर्णधार नझमुल हुसेन शांतोच्या ३८ धावांनी बांगलादेशचा विजय निश्चित केला. यानंतर मुशफिकर रहीम याने (२२) तर शाकिब अल हसन याने २१ धावा करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दुसर्या डावात पाकिस्तानच्या मीर हमजा, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, आघा सलमान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १० गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला होता. पाकिस्तानने पहिल्या कसोटी सामन्यात स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज खेळवला नाही, ज्यामुळे त्यांना परिणाम भोगावे लागले. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात लेगस्पिनर अबरार अहमदचा पाकिस्तानी संघात समावेश करण्यात आला आहे. शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज या फिरकीपटूंनी बांगलादेशच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.