West Indies Team Record : ‘स्पीड’ नाही, ‘स्पिन’चा कहर! वनडेत फिरकीपटूंनीच टाकली सर्व ५० षटके, विंडिज संघाने रचला अद्वितीय इतिहास

BAN vs WI ODI Series : श्रीलंकेचा २५ वर्षांचा विक्रम मोडला
West Indies Team Record : ‘स्पीड’ नाही, ‘स्पिन’चा कहर! वनडेत फिरकीपटूंनीच टाकली सर्व ५० षटके, विंडिज संघाने रचला अद्वितीय इतिहास
Published on
Updated on

वेस्ट इंडिज संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला. त्यांनी एकाही जलदगती गोलंदाजाचा वापर न करता संपूर्ण ५० षटके केवळ फिरकीपटूंनीच टाकवली. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा वेस्ट इंडिज हा पहिला संघ ठरला आहे. या अनोख्या डावपेचाचा फायदा होऊन कॅरेबियन संघाने बांगलादेशला २१३ धावांवर रोखले.

एकही जलदगती गोलंदाज वापरला नाही

संघात अष्टपैलू जस्टिन ग्रीव्स हा एकमेव जलदगती गोलंदाज होता, परंतु विंडिजने त्याचा अजिबात वापर केला नाही. त्याऐवजी, त्यांनी पार्ट-टाईम गोलंदाज एलिक एथेनाझेला संधी दिली. त्याने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण १० षटके टाकली, ज्यात त्याने फक्त १४ धावा देऊन दोन बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोती हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी घेऊन वेस्ट इंडिजच्या फिरकी आक्रमणाचे नेतृत्व केले.

विक्रमी रणनीतीचे कारण

ही लढत पहिल्या सामन्यासाठी वापरलेल्या खेळपट्टीवरच खेळली गेली. ही खेळपट्टी धीमी होती. भेगा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यावर चेंडूला चांगले वळण मिळत होते. त्यामुळे फलंदाजांची भांबेरी उडाली. त्यांना धावा करणे अवघड जात होते. त्यामुळे दुस-या सामन्यात वेस्ट इंडिजने फिरकीवर अवलंबून राहण्याची रणनिती आखली. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या रिशाद हुसैनने याच खेळपट्टीचा फायदा घेत सहा बळी घेतले होते. त्या सामन्यात वेस्ट इंडिजला २०८ धावांचे लक्ष्य गाठता न आल्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजने दुस-या सामन्यात खेळपट्टीच्या याच वैशिष्ट्याचा फायदा घेऊन आघाडी घेण्याचा प्रयत्न केला.

श्रीलंकेचा विक्रम मोडला

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक फिरकी षटके टाकण्याचा यापूर्वीचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी १९९६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ षटके फिरकी गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात मुथैया मुरलीधरन, अरविंद डी सिल्वा, कुमार धर्मसेना, उपुल चंदना, सनथ जयसूर्या आणि हशन तिलकरत्ने यांसारख्या खेळाडूंनी मिळून ७ बळी घेतले होते आणि श्रीलंकेने ३५ धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेने १९९८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही असाच प्रयोग केला होता.

सामन्यातील कामगिरीचा तपशील

मंगळवारी (दि. २१) ढाका येथील शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या डावातील सर्व ५० षटके वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याने फिरकीपटूंकरवी टाकवली.

वेस्ट इंडिजकडून अकील हुसैन, रोस्टन चेज, खेरी पियरे, गुडाकेश मोती आणि एलिक अथांजे या पाच फिरकीपटूंनी प्रत्येकी १०-१० षटके टाकली.

अकील हुसैनने १० षटकांत ४१ धावा देत २ बळी, गुडाकेश मोतीने १० षटकांत ६५ धावा देत ३ बळी आणि एलिक अथांजे यांनी १० षटकांत १४ धावा देत २ बळी घेतले. रोस्टन चेज आणि खेरी पियरे यांना बळी मिळाला नाही.

दीर्घकाळापासून क्रिकेटच्या मैदानावर आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे चर्चेत असलेल्या वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होप याचा सर्व ५० षटके फिरकीपटूंनी टाकवण्याचा निर्णय अत्यंत अनोखा ठरला आणि यामुळेच संघाने एक अद्वितीय विक्रम नोंदवला.

बांगलादेशची फलंदाजी

बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही निराशा केली. बांगलादेश ५० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात २१३ धावा करू शकला. संघाकडून सलामीवीर सौम्य सरकार यांनी ४५ धावा केल्या, तर रिशाद हुसैन यांनी १४ चेंडूंवर नाबाद ३९ धावा, कर्णधार मेहिदी हसन मिराज यांनी नाबाद ३२ आणि नुरुल हसन यांनी २३ धावांचे योगदान दिले. रिशाद हुसैन यांनी डावाच्या शेवटी केलेल्या स्फोटक फलंदाजीमुळे बांगलादेश २१३ पर्यंत पोहोचू शकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news