पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली हा सध्या फॉर्ममध्ये नाही. तो मागील दोन कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे. बांगलादेश आणि त्यानंतर न्यूझीलंड या दोन्ही संघांविरुद्ध त्याच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. आता त्याचे परिणाम या अनुभवी खेळाडूला भोगावे लागत आहेत. वास्तविक, आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये विराट कोहली टॉप 20 फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. 10 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विराट कोहलीच्या वाट्याला इतका वाईट दिवस आला आहे. (virat kohli icc test rankings)
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत विराट कोहली 22व्या क्रमांकावर घसरला आहे. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यात खराब कामगिरी केल्यानंतर विराट कोहलीचे असेच नुकसान झाले होते. मात्र, त्यानंतर विराट कोहलीने अप्रतिम पुनरागमन केले. क्रमवारीत टॉपवर पोहचला. अगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो पूर्वीप्रमाणे उभारी घेऊन टीकाकारांना आपल्या बॅटने प्रत्युत्तर देईल अशी अपेक्षा आहे.
कोहलीने यावर्षी 6 कसोटी सामने खेळले असून त्याला 22.72 च्या सरासरीने केवळ 250 धावा करता आल्या आहेत. त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले आहे. विराटसाठी गेले वर्ष खूप छान होते. त्याने 8 कसोटीत 671 धावा केल्या पण 2020 ते 2022 पर्यंत त्याचा फॉर्म खूपच खराब होता. 2020 मध्ये विराटची कसोटी सरासरी 19.33 होती. 2021 मध्ये त्याची सरासरी 28.21 होती. 2022 मध्ये हा खेळाडू केवळ 26.50 च्या सरासरीने धावा करू शकला. याचा अर्थ गेल्या पाच वर्षांत चार वेळा विराटची फलंदाजीची सरासरी 30 पेक्षा कमी आहे, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.
यशस्वी जैस्वाल हा ICC कसोटी क्रमवारीत भारताचा अव्वल फलंदाज आहे. तो चौथ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत सहाव्या स्थानावर आहे. शुभमन गिल 16व्या, विराट कोहली 22 व्या, तर रोहित शर्मा 26 व्या क्रमांकावर आहे.