

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sakshi Malik vs Babita Phogat : भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने माजी कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांच्या विषयी मोठा खुलासा केला आहे. साक्षीने एका मुलाखतीत सांगितले की देशातील कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जे आंदोलन केले त्याला बबिताने भडकवले कारण तिला बृजभूषण सिंहच्या जागी भारतीय कुस्ती महासंघचं अध्यक्ष व्हायचं होतं. सोमवारी (21 ऑक्टोबर) इंडिया टुडे चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कुस्तीपटू साक्षीने हा आरोप केला आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 2023 च्या सुरुवातीला विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने केली होती. या आंदोलनादरम्यान महिला खेळाडूंचे शोषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या आंदोलनाला प्रोत्साहन देण्यामध्ये माजी महिला कुस्तीपटू बबिता यांचा समावेश असल्याचे साक्षीने म्हटले आहे.
साक्षी मलिकने म्हटले की, ‘बबितानेच कुस्तीपटूंना एकत्र करून महासंघाकडून कुस्तीपटूंना दिला जात असलेला त्रास आणि शोषणा विरोधात आंदोलन करायला सांगितले. बबिताने आमच्याशी सुद्धा संपर्क केला होता. तेव्हा तिने म्हटले की, आम्ही बृजभूषण सिंह यांच्या विरोधात प्रदर्शन करावे. खरंतर त्याच्यामागे बबिताचा स्वतःचा अजेंडा होता. हे मला नंतर समजले. तिला भारतीय कुश्ती महासंघचं अध्यक्ष व्हायचं होतं. आंदोलन सुरू होतं त्यावेळी अशी चर्चा होती की आमच्या या आंदोलना मागे काँग्रेस आहे. पण त्याउलट भाजपच्याच दोन नेत्यांनी आम्हाला आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळवून देण्यासाठी मदत केली होती. हे दोन नेते बबिता आणि तीरथ राणा हे दोघे होते’.
‘बबिताने बैठक बोलविली. सर्व कुस्तीपटू खेळाडूंना बोलाविले. आम्ही तिच्या प्रभावाने हे सर्व केले नाही, पण महासंघात लैंगिक छळ आणि विनयभंगासारख्या घटना होत होत्या. आमचा विश्वास होता की एक महिला प्रभारी बनली तर चांगले होईल आणि तिच्या मनात देखील तेच होते. आम्हाला देखील याची जाणीव झाली होती. तसेच ती एक कुस्तीपटू होती, ती आम्हाला समजून घेईल, काहीतरी बदल करेल असा आम्हाला विश्वास होता. पण ती आमच्यासोबत एवढा मोठा खेळ खेळेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. बबिता आमच्या सोबत आंदोलनाला बसेल आणि आवाज उठवले, कारण तिच्यावेळी देखील अशा काही घटना तिला ऐकायला मिळाल्या होत्या, बघायला मिळाल्या होत्या. मात्र, तसे काही झाले नाही’, असेही साक्षी मलिकने सांगितले.
साक्षी मलिकने लिहिलेल्या ‘Witness’ या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं आहे. या पुस्तकात साक्षीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तिने पुस्तकात तिच्या बालपणीचा एक लैगिक शोषणाचा किस्सा सांगितला आहे. ती म्हणते की, माझ्या शाळेच्या दिवसात शिकवणीचे शिक्षक मला त्रास देत असत. ते मला अवेळी त्यांच्या घरी शिकवणीसाठी बोलवायचे आणि कधी कधी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. त्यांचा तो स्पर्श मला नकोसा वाटायचा. ज्यामुळे मला शिकवणीला जायची भीती वाटत होती पण आईला सांगता येत नव्हते.’
साक्षी ही रोहतक जिल्ह्यातील मोखरा गावची रहिवासी आहे. तिचा जन्म 3 सप्टेंबर 1992 रोजी झाला. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तिनी कुस्ती शिकायला सुरुवात केली. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकले होते. तिच्या नावावर राष्ट्रकुल स्पर्धेतही तीन पदके आहेत. तिने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक, गोल्ड कोस्ट 2018 मध्ये कांस्यपदक आणि त्यानंतर 2022 मध्ये बर्मिंगहॅममध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.