नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
राष्ट्रकुल स्पर्धेत महिला कुस्तीचे सुवर्ण पदक जिंकणारी आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश करुन राजकीय आखाड्यात उडी घेणारी बबिता फोगाट तबलिगी जमातवर केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे सध्या चर्चेत आली आहे. या ट्विटवरुन तिच्यावर समाज माध्यामांवर प्रचंड टीका सुरु झाली आहे. याबाबत बबिता फोगाटने मी काही चुकीचे लिहिलेले नाही. मी माझ्या ट्विटवर कायम आहे असा पवित्रा घेतला तसेच मी काही अभिनेत्री झायरा वसीम नाही, असेही वक्तव्य केले.
कारकिर्द सुरु असतानाच ज्या बबिता आणि तिच्या वडिलांवर चरित्र चित्रपट करण्यात आला तिने गेल्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून शड्डू ठोकला होता. तिने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिकरित्या जमलेल्या दिल्लीतील तबलिगी जमात विरुद्ध काही वादग्रस्त ट्विट केले होते. त्यावरुन तिच्यावर समाज माध्यामांवरुन टीका होत आहे. याचबरोबर तिला या प्रकरणी धमक्याही मिळत असल्याचा दावा बबिताने केला आहे. ती म्हणाली 'काही दिवसांपूर्वी मी तबलिगी जमात विषयी काही ट्विट्स केले होते. त्यानंतर मला सामज माध्यमांद्वारे धमक्या मिळत आहेत. मला सांगायचे आहे की मी काही झायरा वसीम नाही. मी काही घाबरणार नाही. मी कायमच माझ्या देशासाठी लढत आले आहे. मी माझ्या ट्विटवर कायम आहे मी काही चुकीचे लिहिलेले नाही.'
राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री झायरा वसीमने कुस्तीपटू फोगाट पिता – पुत्री यांच्यावरील चरित्र चित्रपट दंगलमध्ये बबिताची बहीण गीता फोगाटची भुमिका केली होती. गेल्या वर्षी तिने चित्रपट सृष्टीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केल्याने तो एक चर्चेचा विषय झाला होता.
बबिता फोगाटने ट्विटरवर वादग्रस्त हॅशटॅग वापरुन कोरोना विषाणूचा देशात १३ हजार लोकांना संसर्ग झाल्याची संदर्भ इस्लामिक पंथाशी जोडला होता. त्यानंतर ट्विटरवर #SuspendBabitaPhogat हा ट्रेंड सुरु झाला होता. या हॅशटॅगद्वारे तिच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर तिच्या समर्थकांना #ISupportBabitaPhogat या हॅशटॅगद्वारे तिचे समर्थन करत प्रतिवाद केला.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बबिता फोगाटने इस्लामिक पंथाविरुद्ध पोस्ट केल्यामुळे ट्विटर अकाऊंट निलंबित केलेल्या अभिनेत्री कंगणा रनौतची बहीण रंगोली चंडेलचेही समर्थन केले होते.