

पुढारी ऑनलाईन डेस्क : अझरबैजानसाठी कुस्ती खेळणारा जॉर्जियाचा पहिलवान जिओर्जी मेशविलदिशविली याने ‘युरोपियन कुस्ती अजिंक्यपद’ स्पर्धेचे मैदान मारले. यासह त्याचा युरोपमधील सर्वोत्तम पैलवानांच्या यादीत समावेश झाला. जिओर्जीने वर्षी पॅरिस ऑलिंपिकमध्ये वयाच्या 32 व्या वर्षी कांस्य पदक जिंकले होते. जिओर्जीने गेल्या तीन वर्षांत सात आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्याने जागतिक कुस्ती क्षेत्रात आपली छाप नुकतीच सोडायला सुरुवात केली असली, तरी याची तयारी दहा वर्षांपूर्वी भारताच्या मातीमध्येच सुरू झाली होती. जिओर्जी भारताच्या कुस्ती सर्किटचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्याच्या ‘युरोपियन चॅम्पियन’ होण्याची कहाणी इथूनच सुरू झाली.
जिओर्जी गेल्या दशकभरापासून भारतातील कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. त्याने इतक्या स्पर्धा खेळल्या आहेत की आता भारताच्या कुस्ती सर्किटमधील लोक त्याला सहज ओळखू लागले आहेत. या काही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा नव्हत्या, तर मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘दंगल’ स्पर्धा होत्या, ज्यात बक्षिसामध्येही गावखेड्याचा तडका असायचा. एका रिपोर्टनुसार, जिओर्जी भारतात ज्या कुस्ती स्पर्धांमध्ये भाग घेत असे, त्यामध्ये बक्षीस म्हणून ट्रॅक्टर, बुलेट मोटरसायकल आणि बैल दिले जात. यावर जिओर्जी म्हणतो, ‘मला भारतीय दंगल खूप आवडतात. चुरशीच्या लढती रंगतात. अगदी ग्लॅडिएटरसारखे वाटते.’
यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणाऱ्या आणि सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कुस्तीच्या लढतींमध्ये या पैलवानाआ ‘जॉर्जियाचा जिओर्जी’ म्हणून ओळखले जाते. जिओर्जीने भारताच्या विविध भागातील जस्सा पट्टी, सिकंदर शेख आणि प्रीतपाल सिंह यांसारख्या बड्या पैलवानांची दोन हात केले आहेत. तो पंजाब, हरियाणा, जम्मू आणि महाराष्ट्रातील गावांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात, गर्दीच्या जयघोषात लंगोट घालून मातीच्या आखाड्यात कुस्ती लढती खेळल्या आहेत.
जिओर्जी आज जरी युरोपचा चॅम्पियन असला तरी भारतात त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की जस्सा पट्टीने केवळ एका मिनिटात जिओर्जीला चीतपट केले होते. मात्र, पराभवानंतरही तो खचला नाही. तो भारतात येत राहिला, शिकत राहिला. अखेर त्याला अलीकडच्या भारत दौऱ्यात जस्सा पट्टीवर मात करण्यात यश आले.
जिओर्जी जेव्हा जेव्हा भारतात आला, तेव्हा त्याने पंजाबच्या मुल्लांपूर येथील विश्वकर्मा महावीर अखाड्यात सराव केला. म्हणजेच त्याला वर्ल्ड क्लास कुस्तीपटू बनवण्यात या अखाड्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. या आखाड्याची सुरुवात 2012 मध्ये विजय शर्मा उर्फ गोलू पैलवान यांनी केली. ते सांगतात, ‘जोओर्जी पहिल्यांदा भारतात आला, तेव्हा तो सर्वसामान्य कुस्तीपटू होता. खरेतर आम्ही जॉर्जियातील कुस्ती प्रशिक्षक व्लादिमीर मेस्तरविशविली यांना पहिल्यांदा भारतात आणले होते, तेव्हा ते त्यांच्यासोबत तेथील अनेक कुस्तीपटू भारतात घेऊन आले. त्यापैकीच एक जिओर्जी होता. जिओर्जी मुळात एका वेगळ्या वातावरणात मिसळण्यासाठी भारतात आला होता, पण इथे येऊन त्याने मातीत खेळल्या जाणा-या ‘देशी दंगल’मध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.’
‘जिओर्जीने भारतात राहून फक्त दंगल खेळणे शिकला नाही, तर आता त्याला रोटी खाणेही आवडायला लागले आहे. तसेच त्याने मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये चमक मिळाल्यानंतर जिओर्जी अजून भारतात परतलेला नाही. मी अजूनही त्याच्या संपर्कात आहे. तो लवकरच आम्हाला भेटायला येईल,’ असा भावना विजय शर्मा यांनी बोलून दाखवली.