

पुढारी ऑनलाईन डेस्क : इटलीची स्टार टेनिसपटू जॅनिक सिनरने ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये खळबळ उडवून दिली आहे. रविवारी (26 जानेवारी) झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा 6-3, 7-6 (7-4), 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. इटालियन खेळाडूच्या कारकिर्दीतील हे तिसरे ग्रँड स्लॅम असून दुसरे ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद ठरले आहे. दोन्ही स्टार खेळाडूंमधील हा अंतिम सामना 2 तास 42 मिनिटे चालला.
जॅनिक सिनर सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. त्याने आठव्या गेममध्ये अलेक्झांडरची सर्व्हिस ब्रेक करून पहिला सेट 6-3 असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये सहा ब्रेक पॉइंट्स मिळाले, जे सर्व गतविजेत्या सिनेरने जिंकले.
जागतिक क्रमवारीत अव्वल असणा-या सिनरचे हे तिसरे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. तो गेल्या ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये चॅम्पियन होता. यानंतर त्याने 2024 चे यूएस ओपन जेतेपद पटकावले. आता त्याने ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद राखले आहे.
दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव्ह आहे, ज्याचे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. तो 2015 पासून ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळत आहे. या काळात, तो तीन वेळा अंतिम सामना खेळला (सध्याच्या अंतिम सामन्यासह), परंतु प्रत्येक वेळी त्याला निराशेचा सामना करावा लागला.
सिनरने मागील ऑस्ट्रेलियन ओपन 2024 चे विजेतेपद जिंकले होते. हे त्याच्या कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम होते. त्यावेळी त्याने अंतिम सामन्यात रशियाच्या डेनिस मेदवेदेवचा 3-6, 3-6, 6-4, 6-4, 6-3 असा पराभव केला.
या वर्षी सिनरने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. आणि त्याचे दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकले. सिनरने वर्षातील शेवटच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत ही कामगिरी केली. त्याने 2024 चे यूएस ओपन जेतेपद जिंकले. त्यावेळी त्याने अंतिम फेरीत टेलर फ्रिट्झचा 6-3, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
23 वर्षीय सिनेरने आतापर्यंत तीन वेळा ग्रँड स्लॅम फायनल गाठली आहे. तिन्ही वेळा त्याने विजेतेपद जिंकले आहे. तो गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करून तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. 2023 च्या विम्बल्डन हंगामातही तो उपांत्य फेरीपर्यंत खेळला होता.