

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना आज शनिवारी सिडनीत होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने टीम इंडियाने गमावले आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा प्रभाव टाकू शकले नाहीत. आजचा हा सामना या दोघांसाठी शेवटचा एकदिवसीय सामना असू शकतो. तसेच, या दोघांचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौराही असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विराट (वय 36) आणि रोहित (वय 38) यांनी याअधीच कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून याआधीच निवृत्ती स्वीकारली आहे. टीम इंडिया पुढील दोन वर्षांत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार नाही. त्यामुळे विराट आणि रोहितचा आजचा सामना आणि हा दौरा कांगारूंच्या देशातील अर्थात ऑस्ट्रेलियाचा शेवटचा दौरा ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज शनिवारी होणाऱ्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’सारखी स्थिती आहे. पहिले दोन सामने गमावल्यानंतर आता किमान तिसरा सामना जिंकून ‘क्लीन स्विप’ टाळ्याचे आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.
विशेष म्हणजे, एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध कधीही ‘क्लीन स्विप’ केलेली नाही. हा ऐतिहासिक पराभव टाळण्यासाठी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला ‘करो वा मरो’ची कामगिरी करावी लागेल.
या वन-डे मालिकेत विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांमध्ये केवळ 12 चेंडू खेळला; पण त्याला खातेही उघडता आले नाही (दोनदा शून्य धावा). रोहित शर्माने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक 81 धावा (एका अर्धशतकासह) केल्या आहेत, तरी त्याला मोठी खेळी करावी लागेल. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 बळी घेतले आहेत. भारतीय संघाचा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर गेल्या नऊ वर्षांपासूनचा रेकॉर्ड खराब आहे.
भारताने येथे शेवटचा एकदिवसीय विजय 23 जानेवारी 2016 रोजी मिळवला होता. तेव्हापासून टीम इंडियाने येथे सलग तीन सामने गमावले आहेत. सिडनीची खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक अनुकूल असून, येथे हाय स्कोरिंग सामना होण्याची शक्यता आहे. प्रथम फलंदाजी करणारा संघ नाणेफेकीचा फायदा घेऊ शकतो.
दरम्यान, फ्युचर टूर प्रोग्रामनुसार, भारतीय संघ पुढील दोन वर्षांत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार नाही. त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही खेळाडू 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळले, तरी या दोघांना आता ऑस्ट्रेलियन मातीवर खेळण्याची संधी मिळणार नाही.