

पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Test Series : ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी आपला संघ शुक्रवारी जाहीर केला. कांगारूंनी आपल्या संघात तीन मोठे बदल केले आहेत. यातील एक बदल हा सलामीच्या जोडीमध्ये तर दुसरा बदल गोलंदाजीत आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नबमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही बॉक्सिंग कसोटी असेल. तर शेवटची कसोटी नवीन वर्षाच्या सुरुवातीला खेळवली जाणार आहे.
सलामीवीर नॅथन मॅकस्विनीच्या जागी युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास आणि जखमी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या जागी झ्ये रिचर्डसनचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच शॉन ॲबॉट आणि ब्यू वेबस्टर यांनाही संघात स्थान मिळाले आहे.
19 वर्षीय सॅम कॉन्स्टासला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने कॅनबेरा येथे भारताविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीच्या सराव सामन्यात शतक झळकावले होते. तर रिचर्डसनने तीन वर्षांहून अधिक काळानंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे. अष्टपैलू ॲबॉट आणि वेबस्टर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पहिला कसोटी सामना शानदारपणे जिंकला होता आणि मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. पण दुस-या सामन्यात वाईट रीतीने पराभव पत्करावा लागला. तिसरा सामना पावसाने प्रभावित झाल्याने तो अनिर्णित राहिला. आता मालिकेतील दोन कसोटी शिल्लक आहेत. मेलबर्न आणि सिडनी येथे होणा-या या सामन्यांकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, जे रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर